February 8, 2026

११७ जमीन मोजणी प्रकरणांचा दोन दिवसांत होणार निपटारा

  • धाराशिव (जिमाका ) – पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने प्रलंबित राहिलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी धाराशिव तालुक्यात ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत दोन दिवसांत ११७ प्रकरणांचा निपटारा केला जाणार असून,यासाठी इतर तालुक्यांतून ५५ सर्वेअर सहभागी होणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
    पावसाळ्यात माहे जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सतत पाऊस व शेतजमिनीत चिखल असल्यामुळे मोजणीची कामे होऊ शकली नाहीत. परिणामी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय,धाराशिव येथे एकूण ७१० मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिली असून त्यापैकी ५१० प्रकरणे मुदतबाह्य आहेत.
    या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख,छत्रपती संभाजीनगर विभागाचे किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
    या मोहिमेअंतर्गत ३ व ४ जानेवारी रोजी ११७ प्रकरणांची प्रत्यक्ष मोजणी होणार आहे.संबंधित जमीनधारकांना नोटिसा पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या असून ई-चावडीवरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.संबंधित अर्जदार व हितसंबंधितांनी या दिवशी उपस्थित राहून आपल्या जमिनीची मोजणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संग्राम जोगदंड यांनी केले आहे.
    ही मोहीम यशस्वी झाल्यास प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणात निपटारा होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
error: Content is protected !!