धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र गट व (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–२०२५ रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत धाराशिव शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या परीक्षेसाठी एकूण ४,५६० उमेदवार बसणार असून श्रीपतराव भोसले हायस्कूल,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल,तांबरी विभाग,जिल्हा परिषद कन्या प्रशाला, विद्यामाता हायस्कूल,श्री श्री रविशंकर विद्या मंदिर,हातलादेवी कॅम्पस,तेरणा पब्लिक स्कूल,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अभिनव इंग्लिश स्कूल,ग्रीनलँड पब्लिक हायस्कूल आदी १५ केंद्रांचा समावेश आहे. हे आदेश दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत लागू राहतील.या काळात परीक्षा केंद्रांच्या परिसरात घोषणाबाजी,गर्दी,वाहनांची ये-जा, झेरॉक्स व इंटरनेट कॅफे,टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,पानपट्टी इत्यादी दुकाने बंद राहतील.मोबाईल फोन,कॅलक्युलेटर, संगणक,फॅक्स,ईमेल आदी साधने परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई राहील. तसेच परीक्षेशी संबंध नसलेल्या व्यक्तींना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.फक्त परीक्षार्थी,नियुक्त अधिकारी-कर्मचारी, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शासकीय कामावरील अधिकारी-कर्मचारी यांनाच प्रवेश राहील.पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यासही मनाई करण्यात आली आहे. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support -online @mpsc.gov.in या ईमेल अथवा ०२२- ६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ यावर विहित वेळेत मदत प्राप्त करून घेता येईल.असे जिल्हा केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान