March 26, 2026

“परीक्षा व्यवस्थेच्या सुरळीततेसाठी केंद्र कर्मचाऱ्यांची मूळ केंद्रावरच नियुक्ती राहू द्या – धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ

  •  लातूर – फेब्रुवारी–मार्च २०२६ रोजी होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षांमध्ये केंद्र संचालक, लिपिक व शिपाई यांची नियुक्ती मूळ केंद्राऐवजी इतर केंद्रावर करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,लातूर विभागीय कार्यालयाकडे केली आहे.
    राज्य मंडळाकडून काढलेल्या संदर्भीय आदेशानुसार केंद्रावरील कर्मचारी बदल्या करून इतर केंद्रावर नियुक्त करण्याचे निर्देश दिल्याने परीक्षा काळात गोंधळ व अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे संघाने निवेदनात नमूद केले आहे.पिण्याचे पाणी,वीज, सीसीटीव्ही,सुरक्षाव्यवस्था व केंद्राची आंतरिक रचना या सर्व बाबींची माहिती मूळ केंद्रावरील कर्मचार्‍यांनाच असते.त्यामुळे ते नसल्यास परीक्षेच्या सुयोग्य व्यवस्थापनाला बाधा येऊ शकते, असा मुद्दा मांडण्यात आला.
    तसेच,गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे मंडळाचे धोरण विद्यमान असून प्रत्येक केंद्रावर इतर शाळांतील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्याची व्यवस्था सक्षम असून नवीन निर्णयामुळे अनावश्यक ताण निर्माण होईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
    या निवेदनावर सुरेश टेकाळे (अध्यक्ष,धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ),अनंत सूर्यवंशी (सचिव),प्रेमचंद देवसाळे (कोषाध्यक्ष) यांच्यासह कळंब, भूम,परांडा,वाशी तालुक्यातील प्रमुख मुख्याध्यापक उपस्थित होते.निवेदन श्रीमती अनुपमा भंडारी (सचिव,विभागीय बोर्ड लातूर) व दत्तात्रेय लांडगे (उपशिक्षणाधिकारी,माध्यमिक, धाराशिव)यांना सादर करण्यात आले.
error: Content is protected !!