कळंब – नगर परिषद निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करणे हीच माझी प्राथमिकता असून,जाहीरनाम्यात नमूद केलेली सर्व विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण केली जातील,असा ठाम विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केला. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या,अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी व्यवस्थापन,स्वच्छता, आरोग्य सुविधा,स्ट्रीट लाईट्स, महिला व युवकांसाठी उपक्रम, तसेच शहर सुशोभीकरण या प्रमुख मुद्द्यांवर तातडीने काम हाती घेतले जाईल,असेही नगराध्यक्ष कापसे यांनी सांगितले. विशेषतःशहरातील दुर्लक्षित भागांचा विकास,गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांच्या मूलभूत गरजांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नगर परिषद म्हणजे केवळ कार्यालय नव्हे,तर नागरिकांचे प्रश्न ऐकणारे आणि सोडवणारे व्यासपीठ असले पाहिजे, असे सांगत जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हीच आपल्या कार्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी नागरिकांचे मतदार म्हणून आभार मानत,शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहनही केले.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव