September 24, 2026

समाजहिताच्या कार्यातून घडलेले “धाराशिव आयकॉन” : हनुमंत (तात्या) मडके

  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी समाजाच्या उन्नतीसाठी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहेकर उद्योग समूहाने सातत्याने केले आहे.
    या समाजोपयोगी कार्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष,माजी माध्यमिक शिक्षक हनुमंत (तात्या) मडके होत.

  • शिक्षक म्हणून अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्यानंतरही समाजाशी असलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही. सेवानिवृत्तीनंतरही ‘समाजासाठी काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून त्यांनी उद्योग, अर्थकारण,शिक्षण व सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत कार्याची नवी दिशा दिली.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम उभे केले.
    मोहा व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना हक्काचे काम व कामाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या.त्यामुळे अनेक युवकांचे जीवनमान स्थिर झाले असून स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला आहे.स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन रोजगारनिर्मिती करण्याचा त्यांचा दृष्टिकोन सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अँग्रो इंडस्ट्रीज,मोहा यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा,त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढावे,यासाठी घेतलेली ही भूमिका ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक ठरली आहे.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्टील इंडस्ट्रीजच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांची पत्रा व स्टीलची गरज स्थानिक पातळीवरच पूर्ण होऊ लागली. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे.
    आर्थिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मोहा यांच्या माध्यमातून नवउद्योजक,व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी मोलाची मदत करण्यात आली.

  • मोहा येथील मुख्य शाखेसह महाराष्ट्रातील विविध भागांत तसेच कर्नाटकसारख्या राज्यांत शाखा स्थापन करून अनेक नागरिकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.
    उद्योग व अर्थकारणापुरतेच न थांबता सामाजिक,शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांमध्येही हनुमंत (तात्या) मडके यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
    शांत,संयमी,मनमिळावू व अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे ते सर्वसामान्य नागरिकांपासून मान्यवरांपर्यंत सर्वांचे विश्वासाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
    या सर्व समाजोपयोगी कार्याची दखल घेत प्रतिष्ठित दै.लोकमत समूहाच्या वतीने प्रकाशित झालेल्या “धाराशिव आयकॉन” या पुस्तकात हनुमंत (तात्या) मडके यांच्या कार्याची विशेष नोंद घेण्यात आली.
    दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नसून, समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

  • या गौरवप्रसंगी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंब तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून त्यांच्या भावी सामाजिक, औद्योगिक व सेवाभावी कार्यासाठी मंगलमय सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

 

error: Content is protected !!