February 8, 2026

गोविंदपूरच्या शेतकऱ्याची थेट इराणला केळी निर्यात;दोन एकरांतून तब्बल ५० टन उत्पादन

  • गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील प्रयोगशील शेतकरी हिरालाल सिताराम मुंडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवडीकडे वाटचाल केली असून,केवळ दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड करून तब्बल ५० टन उत्पादन घेत थेट इराणला केळी निर्यात करून यश संपादन केले आहे.
    पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत शेतीची पाहणी केल्यानंतर हिरालाल मुंडे यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर दर्जेदार रोपांची लागवड करून पाणी व्यवस्थापन, वेळेवर फवारण्या व मेहनतीच्या जोरावर केळीची बाग उत्तमरीत्या जोपासली. परिणामी भरघोस व दर्जेदार घडांचे उत्पादन मिळाले.
    केळी तोडणीस आल्यानंतर त्यांनी इराणमधील कंपनीच्या एजंटशी संपर्क साधला. एजंटने प्रत्यक्ष पाहणी करून १३ ते १४ रुपये प्रतिकिलो दराने केळीची खरेदी केली. सध्या केळीची तोडणी करून जागेवरच वजन, पॅकिंग व बॉक्समध्ये भरून निर्यातीसाठी प्रक्रिया सुरू आहे. वजन पूर्ण होताच शेतकऱ्याला जागेवरच पैसे मिळणार आहेत.
    दोन एकर क्षेत्रातून जवळपास ५० टन केळीचे उत्पादन अपेक्षित असून, गोविंदपूरसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही प्रेरणादायी बाब ठरत आहे. मात्र, उत्पादन भरघोस झाले असले तरी बाजारातील दरातील घसरणीमुळे अपेक्षित नफा मिळाला नसल्याची खंत शेतकरी हिरालाल मुंडे यांनी व्यक्त केली. दोन महिन्यांपासून केळीचे दर २२ रुपयांवरून थेट १३ रुपयांपर्यंत घसरल्याने उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे,मॅनेजर विश्वास केंगार यांची उपस्थिती होती.
    गोविंदपूरच्या शेतकऱ्याने केलेली थेट परदेशी निर्यात ही ग्रामीण भागातील शेतीसाठी नवी दिशा देणारी ठरत आहे.
error: Content is protected !!