भाटशिरपूरा – येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव प्रयोगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्राथमिक गटात शाळेने सादर केलेल्या ‘रुरल फार्मिंग स्मार्ट डोम’ या प्रायोगिक संकल्पनेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले. हा प्रयोग कु.प्रणिता पद्माकर मडके व कु. वैष्णवी बापू मडके यांनी सादर केला. या प्रयोगातून डोम स्ट्रक्चरद्वारे पावसाचे पाणी अडवून ते शेतीसाठी उपयुक्तरीत्या वापरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे दाखवण्यात आली. पाण्याची बचत आणि शेतीसाठी जलसंधारणाचे महत्त्व विद्यार्थिनींनी उत्कृष्टरीत्या मांडले. उच्च माध्यमिक विभागातून प्रगती जाधव आणि साक्षी जाधव यांनीही विज्ञान प्रदर्शनात आपला प्रयोग सादर करून शाळेची कामगिरी आणखी उज्ज्वल केली. या सर्व प्रयोगांसाठी सहशिक्षक शैलेश गुरव, नीता सोनवणे व प्रा. प्रतिभा सावंत यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवदत्त पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश मडके यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सुनील साबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशामुळे मोहा विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या नावावर विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्टतेचा ठसा उमटवला आहे.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन