धाराशिव – धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था ही जवळपास २२ महिने रेंगाळलेल्या निविदा प्रक्रियेचा परिणाम असल्याचा ठपका ठेवत, या मुद्द्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे (उबाठा) आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हा विषय ठळकपणे मांडला. अध्यक्षस्थानी तालिकाध्यक्ष चैनसुख संचेती असताना आमदार पाटील म्हणाले की,फेब्रुवारी 2024 मध्ये शहरातील रस्त्यांसाठी मंजूर केलेला 140 कोटींचा निधी निविदांची स्थगिती,तांत्रिक प्रक्रिया आणि प्रशासकीय विलंबात अडकला.परिणामी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.अनेक अपघात,मृत्यू आणि जखमींची उदाहरणे त्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यांनी स्पष्ट सवाल केला — “गतिशील महाराष्ट्र म्हणणाऱ्या सरकारमध्ये एका निविदेची प्रक्रिया २२ महिने कोणामुळे थांबली? जबाबदार कोण? एसआयटी चौकशी अपरिहार्य आहे.” नगरविकास खात्याच्या चौकशी अहवालांमध्ये झालेल्या विसंगतीवरही त्यांनी बोट ठेवले. उद्यान,आठवडी बाजार व स्थगितीचा प्रश्न – शहरातील उद्यानांसाठी व आठवडी बाजाराच्या विकासासाठी मंजूर निधीवर झालेली स्थगिती तात्काळ उठवावी, अशीही मागणी त्यांनी केली. धाराशिव शहरात एकही सक्षम उद्यान नसल्याचे त्यांनी अधोरेखित करत उच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्याची सूचना नगरविकास मंत्र्यांनी द्यावी,असेही ते म्हणाले.
वित्त आयोगाचा निधी घसरल्याने यंत्रणा ठप्प – पूर्वी धाराशिव नगरपालिकेला मिळणारा १५ कोटी रुपयांचा निधी आता फक्त ३–४ कोटींवर आला असल्याने पाणीपुरवठा,घनकचरा व्यवस्थापन आणि दिवाबत्तीची यंत्रणा विस्कळीत झाली आहे. मागील वर्षात एकही हप्ता न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.
शहरातील कचऱ्याचे डोंगर – नागरिकांचे हाल शहरातील मध्यवस्तीत आलेल्या कचरा डेपोमुळे श्वसनविकार, दुर्गंधी आणि पर्यावरणीय संकट निर्माण झाले असल्याने कचरा डेपो तातडीने शहराबाहेर हलवण्याची मागणी त्यांनी केली.
चार गावांची संयुक्त पाणीपुरवठा योजना ठप्प –
तेर,ढोकी,कसबे तुडवळा आणि येडशी गावांसाठीची संयुक्त योजना वीजपुरवठा बंद झाल्याने थांबली आहे. सौर प्रकल्प असूनही मिटरिंग आणि देयकाच्या अडचणींमुळे ५० हजार लोकसंख्या पाण्याविना राहिली आहे. या वीजबिलाची हप्त्याने परतफेड आणि वीजपुरवठा सुरू करण्याची विनंतीही त्यांनी सभागृहात केली. हिवाळी अधिवेशनातील हा मुद्दा सध्या पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत असून रस्त्यांच्या कामांवर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
More Stories
प्रजासत्ताक दिन : केवळ सोहळा नव्हे, तर जबाबदारीची आठवण
गुटखा विक्री केल्यास आता मोक्का लावणार – मुख्यमंत्री फडणवीस
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आ.कैलास पाटलांचा विधानभवनात प्रहार!