रांजणी – तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीने हजरत खांजा बद्रोद्दीन रहे.दर्गाह परिसरात कागदोपत्री पाण्याची टाकी बांधकाम दाखवून तब्बल तीन लाख रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामविकास व सुविधा निर्माण करण्यासाठी रांजणी ग्रामपंचायतीला वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून दर्गाह परिसरात पाण्याची टाकी उभारण्यासाठी तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्या परिसरात एकाही प्रकारची टाकी उभारण्यात आलेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीदेखील हा संपूर्ण निधी दोन टप्प्यांत उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती व बांधकाम विभाग यांच्या संगनमताने निधीचा अपहार झाला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या संदर्भातील तक्रारीवर सलमानखान शेरखां पठाण, शिराज हसन शेख, साजीद शेख, सनशेरखाँ पठाण यांच्यासह एकूण ४५ ग्रामस्थांनी स्वाक्षरी केली असून तातडीने चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी