लातूर – युगपुरुष,बहुजन उद्धारकर्ते,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूर शहरात अत्यंत श्रद्धा,आदर आणि कृतज्ञतेच्या वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने हा अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरवासीयांनी आदरांजली वाहिली. यानंतर भिक्खू संघाने त्रिसरण व पंचशील देत सामाजिक नैतिकता, मानवता,एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश दिला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक नवभारताचे शिल्पकार आहेत. ६९ वर्षांपूर्वी भारताने एक अद्वितीय विद्वान,तत्त्वज्ञ, विचारवंत आणि समाजनायक गमावला. वंचित-शोषित समाजासाठी त्यांनी दिलेला स्वाभिमान, संविधान आणि बुद्धधम्म ही अनमोल शिदोरी आहे. डॉ.बाबासाहेबांचे जीवन हे मानवमुक्तीचा मार्ग दाखवणारे आंदोलन होते. त्यांचे विचार आजही तेजस्वी आणि मार्गदर्शक आहेत.” यानंतर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ.बाबासाहेबांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. “अमर रहे… अमर रहे… बाबासाहेब अमर रहे!” या घोषणांनी परिसर निनादून गेला. कार्यक्रमाला भंते बोधिराज, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, युवा नेते अजित पाटील कव्हेकर, तसेच समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार महादेव चिकटे, डी. एस. नरसिंगे, प्रा. डॉ. संजय गवई, भीमराव चौदंते, अनंत लांडगे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, राहुल कांबळे, विनय जाकते, वैभव गायकवाड, डॉ. विजय अजनिकर, चिंटू गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन गायकवाड,ॲड.रोहित सोमवंशी, डॉ.जितेंद्र वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच समाजातील प्रतिष्ठित डॉक्टर, वकील, महार बटालियनचे आजी-माजी सैनिक, कर्मचारी वर्ग, महाविहार धम्मसेवक ग्रुप, भारतीय बौद्ध सभा आणि बौद्ध उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून महामानवाला विनम्र आदरांजली अर्पण केली.
More Stories
समाजसेवेचा गौरव;सुधाकर रणदिवे यांना लातुरात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव