लातूर – त्रिरत्नांचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी निरंतर कार्यरत असलेल्या बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर आणि समस्त लातूरकरांच्या सहकार्याने पु. भिक्खू डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शना खाली आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद रामेगाव,बार्शी रोड येथील महाविहार धम्म संस्कार केंद्रात २५ डिसेंबर २०२५ रोजी भव्य स्वरूपात होणार आहे.या परिषदेच्या माध्यमातून धम्मक्रांती, मानवता,बंधुता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्नात पाहिलेले बौद्धमय भारताचे दृश्य अधिक प्रभावीपणे समाजासमोर मांडले जाणार आहे,असे परिषदेचे मुख्य संयोजक पु.भिक्खू पय्यानंद थेरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला भंते बोधिराज,प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे,केशव कांबळे,डॉ. सुधाकर गुळवे,डी.एस.नरसिंगे, एम.एन.गायकवाड,पांडुरंग अंबुलगेकर,देवदत्त सावंत,प्राचार्य. डॉ.दुश्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई, अंतेश्वर थोटे, प्रा. यु. डी. गायकवाड, बसवंतप्पा उबाळे, करण ओव्हाळ, उदय सोनवणे, ऍड. आनंद सोनवणे, प्रा. कल्याण कांबळे, व्ही. आर. बोरीकर, गौतम सूर्यवंशी, मिलिंद धावारे, सुजाता अजनिकर ई. सह मोठ्या संख्येने उपासक उपासिकांची उपस्थिती होती.
आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन पु. भिक्खू करूणानंद महाथेरो, संघनायक (दिल्ली) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान अ.भा. भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भिक्खू धम्मसेवक महाथेरो (मूळावा) भूषवणार आहेत. याच प्रसंगी प्रतिष्ठेच्या सातकर्णी स्मरणिकेचे प्रकाशन पु.भिक्खू प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळची सुरुवात धम्ममय वातावरणात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी ०८:०० वाजता पंचरंगी धम्मध्वजारोहणा नंतर उपासक-उपासिकांच्या भव्य उपस्थितीत धम्म मिरवणूक निघणार आहे. अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, बसस्टँड मार्गे जात ही मिरवणूक आंबेडकर पार्क येथे समारोप पावेल. यानंतर सकाळी १०:०० वाजता मुख्य धम्मध्वजारोहण भिक्खू शरणानंद महाथेरो, पाथरी यांच्या हस्ते विधिपूर्वक करण्यात येईल. या वर्षीच्या परिषदेत देशभरातील तसेच परदेशातील अनेक नामवंत भिक्खू सहभागी होत असून त्यांच्या धम्मदेशनेमुळे ज्ञान, प्रेरणा आणि चिंतनाचा समृद्ध अनुभव मिळणार आहे. यावेळी भिक्खू प्रा. डॉ. सत्यपाल महाथेरो (छ. संभाजीनगर), भिक्खू दयानंद महाथेरो (मूळावा), भिक्खू डॉ. यशकाश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर), भिक्खू पय्यातीस्स महाथेरो (शिरसाळा), भिक्खू धम्मानंद महाथेरो (अंदूर–बिदर) तसेच अनेक वरिष्ठ भिक्खूगणांचा समावेश असेल. हजारो उपासक–उपासिका आणि धम्मप्रेमी या परिषदेत सहभागी होणार असल्याने लातूर नगरी पुन्हा एकदा धम्ममय होणार आहे. लातूर जिल्हा धम्म प्रचारातील अग्रणी केंद्र मानला जातो. तेर (तगर) नगरी, खरोसा लेणी यांसारखी बौद्धकालीन प्राचीन स्थळे या परंपरेचा वारसा जपतात. पु.भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेले महाविहार धम्म संस्कार केंद्र हे आज राज्यातील धम्म शिक्षणाचे प्रभावी केंद्र आहे. २०१७ पासून आजपर्यंत सात परिषदा यशस्वीरीत्या आयोजित करून लातूरने धम्म प्रचारात एक मोलाची परंपरा निर्माण केली आहे. सर्व धम्मप्रेमींना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या वेळी केले आहे. लातूर, मराठवाडा आणि महाराष्ट्रातून हजारो उपासक उपस्थित राहणार आहेत. हंगामी नियोजन कार्यकारिणीमध्ये मार्गदर्शक : पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, अध्यक्ष / मुख्य संयोजक : भिक्खू पय्यानंद थेरो, उपाध्यक्ष : डॉ. सदानंद कांबळे, इंजि. सचिन गायकवाड व इतर, सचिव : प्रा. देवदत्त सावंत, कोषाध्यक्ष : डॉ. अरुण कांबळे, स्मरणिका प्रकाशन : प्राचार्य डॉ. दुश्यंत कटारे, मिलिंद धावारे यांचा समावेश आहे. लातूरमध्ये होणारी आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून धम्म, बंधुता आणि मानवतावादाच्या नव्या युगाची सुरूवात आहे.धम्माच्या प्रसारासाठी, सामाजिक ऐक्यासाठी आणि आंबेडकरी तत्वज्ञानाच्या पुनर्जीवनासाठी ही परिषद निश्चितच एक मैलाचा दगड ठरेल.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो