कळंब – मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी (मंगळवार) अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कळंब तालुक्यातील खोंदला परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील सुपीक माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.इंद्र मनी यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत,अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत तोंड देण्यासाठी पिक पद्धतीत कोणते बदल करता येतील,तसेच भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी कोणत्या शाश्वत शेती पद्धती अवलंबाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वाहून गेलेल्या मातीचे नमुने स्वतःगोळा करून ते विश्लेषणासाठी परभणी येथील कृषी प्रयोगशाळेत पाठविले. या अभ्यासातून त्या भागातील मातीची रासायनिक गुणवत्ता, सेंद्रिय घटकांचे प्रमाण आणि पुनर्भरणासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात येणार आहेत. या पाहणीदरम्यान जिल्हा कृषी अधिकारी महादेव असलकर, तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे,उपकृषी अधिकारी बप्पासाहेब पाटील आदी मान्यवर तसेच खोंदला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलगुरूंच्या या पाहणीमुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली असून, विद्यापीठाच्या मार्गदर्शनातून पुनःशेती सक्षम करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी