February 8, 2026

मांजरा नदीकाठच्या घरांचे तातडीने पुनर्वसन व्हावे –डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची शासनाकडे मागणी

  • कळंब – मांजरा नदी काठी असलेल्या भीमनगर,साठेनगर, बुरुड गल्ली,ढोर गल्ली,खाटीक गल्ली,भोई गल्ली आणि माळीवाडा या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. सध्या अतिवृष्टीमुळे नदीला वारंवार पूर येत असल्याने या परिसरातील रहिवाशांच्या जीवित व संपत्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
    १९८० ते १९८३ दरम्यान या परिसरातील काही भागांचे पुनर्वसन झालेले असले तरी अजूनही अनेक कुटुंबे धोक्याच्या छायेत जीवन जगत आहेत. पूरस्थिती सतत उद्भवत असल्यामुळे याच परिसरातील उर्वरित भागांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
    या मागणीसाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागाचे पुनर्वसन झालेल्या विभागालाच हे क्षेत्र लागून असल्याने शासनाने याठिकाणीही पुनर्वसनाची कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    स्थानिक जनतेच्या वतीने करण्यात आलेल्या या निवेदनावर समितीचे विश्वस्त तथा माजी नगरसेवक सुनील गायकवाड,शिवाजी शिरसाट आणि माणिक गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    शासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन वरील सर्व विभागातील घरांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी,अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
error: Content is protected !!