May 9, 2026

शूर शहीद सैनिकांच्या स्मारकासाठी वारंवार मागणी – प्रशासनाची उदासीनता कायम!

  • माजी सैनिकांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
  • कळंब (माधवसिंग राजपूत) –
    शूर शहीद सैनिकांचे अमर जवान स्मारक कळंबच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे यासाठी माजी सैनिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी केली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १७ सप्टेंबर अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी तसेच इतर वेळीही हे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले. मात्र या मागणीवर प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.
    याबाबत माजी सैनिकांनी कळंब उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सैनिकांच्या बलिदानाचा व राष्ट्रीय भावनांचा अपमान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
    पूर्वी नगरपरिषदेकडून स्मारकासाठी मंजूर झालेली जागा बदलून ती स्वामी समर्थ संस्कार केंद्रासाठी देण्यात आली होती. तसेच नगरपरिषदेने वाटप केलेल्या काही जागांचा वापर आजही होत नाही. त्यामुळे अशा जागा परत घेऊन माजी सैनिकांसाठी द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. “माजी सैनिकांना दिलेली जागा जशी परत घेतली, तशीच न वापरलेली जागा सैनिक स्मारकासाठी द्यावी” असेही यात नमूद करण्यात आले आहे.
    माजी सैनिकांचे म्हणणे आहे की, या निवेदनाला प्रशासनाकडून दोन ओळींचे उत्तरही दिले जात नाही, ही बाब गंभीर आहे. तरीदेखील माजी सैनिक सातत्याने विविध कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात – हर घर तिरंगा, सिंदूर ऑपरेशन, विजय रॅली, कारगिल विजय दिवस, गिनीज बुकमध्ये नोंद झालेली वृक्षलागवड मोहिम आदींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे.
    कळंब तालुक्यातील वीरमाता व वीरपत्नी यांनी आपल्या शूर शहीदांच्या स्मृती जपण्यासाठी वैयक्तिक जागेत स्मारके उभारली आहेत. तरीदेखील कळंब शहरातच मध्यवर्ती ठिकाणी अमर जवान स्मारक उभारले जाणे आवश्यक आहे, ही माजी सैनिकांची एकमुखी मागणी आहे.
    “या मागे कोणताही स्वार्थ नसून केवळ राष्ट्रीय भावना व शहिदांचा सन्मान हाच निर्मळ हेतू आहे. आम्ही शिस्त, प्रामाणिकपणा, नम्रता आणि स्वाभिमानाने ही मागणी मांडत आहोत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्मारकासाठी किमान पाच गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
    हे निवेदन वीरमाता,वीरपत्नी, विधवा व माजी सैनिक बांधव यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
error: Content is protected !!