दिनांक १७ सप्टेंबर हा मराठी मनावर कोरला गेलेला हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन.निजामशाहीच्या जुलमी राजवटीत दशकानुदशके शोषित झालेल्या मराठवाड्याने,तसेच तत्कालीन हैद्राबाद संस्थानातील शेतकरी,कष्टकरी, सामान्य जनतेने स्वातंत्र्याची आस धरली होती.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला तरी निजामच्या हटवादी भूमिकेमुळे हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले नाही.उलट लोकांवर अत्याचार,निरपराधांचे कत्तलखाने, रझाकारांनी हल्ले सुरू केले. याच काळात हजारो शेतकरी, मजूर, शिक्षक,महिला,तरुणांनी आपले प्राण पणाला लावून निजामशाहीच्या विरोधात विद्रोह उभारला.हैद्राबाद मुक्तिसंग्राम ही केवळ राजकीय लढाई नव्हती;ती होती न्याय,समानता आणि स्वाभिमानाची क्रांती.अखेर भारतीय लष्कराच्या पोलिस अॅक्शनमुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामशाहीचा अंत झाला व मराठवाड्यासह संपूर्ण हैद्राबाद संस्थान भारतीय लोकशाहीत सामील झाले. हा दिवस म्हणजे आपल्या लोकशाहीचा विजय, अत्याचारावर न्यायाचा विजय, गुलामगिरीवर स्वातंत्र्याचा विजय आहे. या संघर्षात शेतकऱ्यांचे त्याग, क्रांतिकारकांचे बलिदान आणि सामान्य जनतेची जिद्द आजच्या पिढीने लक्षात ठेवली पाहिजे. आज आपण मुक्त भारतात स्वाभिमानाने श्वास घेतो, संविधानिक अधिकारांचा उपभोग घेतो,याचे श्रेय त्या लढवय्यांना जाते ज्यांनी निजामशाहीच्या सावलीतही स्वातंत्र्याची मशाल पेटवली.म्हणूनच १७ सप्टेंबर हा दिवस केवळ स्मरणाचा नसून प्रेरणेचा आहे. आजच्या तरुणाईने इतिहासातील या क्रांतिकारी वारशातून लोकशाहीचे भान, सामाजिक समतेची जाणीव व स्वाभिमानाची प्रेरणा घ्यावी. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जळका धानोरा अर्थात सध्याचे देवधानोरा या गावाचा इतिहास स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान, अन्याय आणि संघर्षाचा साक्षीदार आहे. निजामशाहीच्या काळात रझाकारांच्या अत्याचारांनी संपूर्ण मराठवाडा विद्धस्त झाला.त्यावेळी अनेक गावे जाळली गेली, शेकडो निरपराध जीव उद्ध्वस्त झाले. जळका धानोरा ही त्यापैकीच एक दुर्दैवी घटना. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही निजामने भारतात विलीन होण्यास नाकारला.रझाकारांच्या टोळक्यांनी हैद्राबाद संस्थानभर दहशत पसरवली. मराठवाड्यातील जनता शेतकरी,मजूर, वतनदार,अस्पृश्य समाजातील लोक यांच्या रूपाने सर्वाधिक छळली गेली. धर्मांधतेच्या नावाखाली लूटमार,खून आणि गावं जाळण्याचे प्रकार घडत होते. या दहशतीच्या लाटेत कळंब तालुक्यातील जळका धानोरा गावावर रझाकारांनी हल्ला केला.गाव पेटवून दिले,झोपड्या-घरं जाळली,धान्य व मालमत्ता जप्त केली. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी गाव सोडावे लागले. गावातील गरीब शेतकरी, वतनदार, तसेच मागासवर्गीय समाजावर या घटनेचा सर्वाधिक आघात झाला. हा प्रसंग आजही गावकऱ्यांच्या स्मरणात जिवंत आहे. राखेतून उभी राहिलेली वाडीतली घरे आणि विस्कळीत झालेलं आयुष्य हे या गावाच्या जखमा आजही ताज्या ठेवतात. या काळात मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांच्या दहशतीविरुद्ध आवाज उठविला. गोविंदभाई श्रॉफ, वसंतराव नाईक, विष्णुपंत पाटील,बाबासाहेब परचके, नानासाहेब डोंगरे, गणपतराव कथले यांसारख्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यातील संघर्ष उभारला. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी भूमिगत चळवळ उभारून गावकऱ्यांना आधार दिला. त्यांच्या त्यागामुळे अखेरीस भारतीय लष्कराने पोलिस अॅक्शन द्वारे १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामशाही संपवली आणि हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. स्वातंत्र्य सहज मिळालं नाही.ते सामान्य जनतेच्या डोळ्यांतून गाळलेल्या रक्त-घामाच्या किमतीवर आले.आज आपण लोकशाहीत जगत असलो तरी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा या संघर्षांतूनच मिळते. रझाकारांच्या दहशतीत जळून खाक झालेलं जळका धानोरा गाव आजही मराठवाड्याच्या जखमा सांगतं. त्या गावाच्या स्मृती हे फक्त दुःखद इतिहास नाहीत,ते भविष्यातील पिढ्यांसाठी लोकशाही,समानता आणि स्वातंत्र्य जपण्याची जाणीव करून देणारे आहेत. जळका धानोऱ्याच्या हुतात्म्यांना व गावकऱ्यांना आज साक्षी पावन ज्योत परिवारातर्फे नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन