March 26, 2026

राज्यात सर्वसमावेशक कर्करोग उपचार धोरण – मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

  • मुंबई – राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने तातडीने धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री सौ. माधुरी मिसाळ,सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विनायक निपुण, सचिव वीरेंद्र सिंग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कर्करोग नियंत्रण प्रकल्पाचे मानद सल्लागार कैलास शर्मा, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश,डॉ.श्रीपाद बनावली, डॉ. पंकज चतुर्वेदी आदी उपस्थित होते.
    मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्यातील रुग्णांना वेळेत व प्रभावी सेवा मिळाव्यात यासाठी सर्वसमावेशक कर्करोग धोरण आवश्यक आहे. कर्करोग उपचारासाठी विविध स्तरांवर केंद्रांची उभारणी व्हावी. प्रत्येक जिल्ह्यात निदान, डे केअर, रेडिओथेरपी व केमोथेरपी युनिट्स सुरू कराव्यात.”
    त्यांनी पुढे सांगितले की, नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाचे अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करून रुग्णसेवेसाठी उपलब्ध करावे. या कामासाठी आवश्यक निधी पुरवणी मागणीतून उपलब्ध करून दिला जाईल. तसेच श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने साईनगर, शिर्डी येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
    राज्यातील उपचार केंद्रांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी एल-३ साठी सिंगल क्लाउड कमांड सेंटर स्थापन करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. “कर्करोगाशी लढा देणाऱ्या रुग्णांना शीघ्र निदान व परिणामकारक उपचार मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
error: Content is protected !!