February 9, 2026

महाबोधी महविहार हे बौद्धांची पाळेमुळे असल्याने ते पुरोहित मुक्त करणे आवश्यक – भन्ते विनाचार्य

  • भारतातील सर्व बौद्धांना जागृत करणार
  • धाराशिव – तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढीत विज्ञानाच्या व सद् धम्माच्या मार्गावर आणले. त्यामुळे संपूर्ण जगात भारत ही तथागतांनी पवित्र झालेली बुद्धभूमी आहे.बुद्धांना संबोधी प्राप्त झाली ते ठिकाण बिहारमधील बोधगया असून त्या ठिकाणी महाबोधी महाविहार बांधण्यात आलेले आहे. या विहारांमध्ये बौद्ध किंवा भिक्खू ऐवजी पंडे हे पुरोहित घुसलेले आहेत. ज्या गौतम बुद्धांनी दुःखातून सर्व जगाला मुक्त केले. त्या विहार परीसरात घुसलेले पंडे पिंडदान करण्यासह विविध प्रकारच्या अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत आहेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाबोधी महाविहार हे बौध्दांची मुख्य पाळेमुळे आहेत.त्यामुळे ते महाविहार पंडे अर्थात पुरोहित मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतातील बौद्ध समाजाला जागृत करून लढा उभारून ते पुरोहित मुक्त करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भन्ते विनाचार्य यांनी दि.८ सप्टेंबर रोजी केले.
    धराशिव शहरातील परी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी भन्ते शाक्यपुत्त राहुल,भन्ते रोहित,भन्ते संघरत्न,भन्ते धम्मरत्न,भन्ते संघपाल,भन्ते महाथेरो,भन्ते उत्तम बोधी,भन्ते विनय बोधी,भन्ते विनय कीर्ती आदींसह भिक्खू संघ यांची प्रमुख उपस्थित होते.
    प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    पुढे बोलताना भन्ते विनाचार्य म्हणाले की,महाबोधी महाविहार येथे देश विदेशातील बौद्ध लोक येतात. या विहारांमध्ये बौद्ध व भिक्खू ऐवजी महंतांनी घुसखोरी केलेली आहे. पुरोहितांनी ताबा मिळविला असला तरी तो संविधानिक कायद्यानुसार नसून त्यासाठी बी टी ऍक्ट हा गैर संविधानिक कायदा मुख्यमंत्र्यांच्या सक्तीने लागू केलेला आहे. त्यामुळे तो रद्द करुन ते विहार पुरोहित मुक्त करावे यासाठी १३४ वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, सरकारने ते अजून मुक्त केलेले नाही. एकीकडे मक्का, मस्जित या ठिकाणी मुस्लिमांचे मौलवी, बालाजी मंदिर व इतर मंदिरात हिंदूंचे पुजारी व चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंचा ताबा आहे. तर दुसरीकडे बौद्धांच्या बुद्ध विहारात बौद्धांऐवजी हिंदू पुरोहितांनी घुसखोरी केली असल्याचे विदारक वास्तव त्यांनी निदर्शनास आणून दिले. संपूर्ण जगात भारतात संबोधी प्राप्त करणारे तथागत गौतम बुद्ध हे एकमेव आहेत. त्यांनी चालू केलेली ज्ञानाची ज्योत नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथागत गौतम बुद्ध यांचे स्तूप, शिल्प, मुर्त्या यांना मातीत दडपले आणि मूर्त्यांना वेगवेगळे रंग दिले जात आहेत. तसेच बौद्धांचे साहित्य जाळले व विहार नष्ट करून त्यांना मंदिराच्या शृंखलेत उभा केले आहे. मात्र, भारताची ओळख तथागत गौतम बुद्धाची बुद्ध भूमी म्हणून संपूर्ण जगात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. कारण राष्ट्रध्वजावर अशोक चक्र असून ते बौद्धांचे प्रतीक आहे. तर भारत रत्न व भारताचे चलन यावर देखील बौद्धकालीन प्रतिकांचा राष्ट्र चिन्हांत समावेश केलेला आहे. विशेष म्हणजे महाबोधी महाविहारसाठी १५६ देशातून दान येत आहे. महाबोधी विहार पुरोहित मुक्त करून संपूर्ण भारत बुद्धमय करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतातील सर्व बौद्धांनी जागृत होऊन एकत्र येत मोठा लढा उभारावा व महाबोधी विहार मुक्त करावे असे आवाहन भन्ते विनाचार्य यांनी केले. यावेळी भन्ते शाक्यपुत्त राहुल, भन्ते रोहित व रमाकांत गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पृथ्वीराज चिलवंत यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी व उपस्थितांचे आभार प्रा.राम चंदनशिवे यांनी मानले. यावेळी भन्ते शाक्यपुत्त राहुल,भन्ते रोहित व रमाकांत गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!