कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरदचंद्र महाविद्यालय, शिराढोण येथील प्राचार्य डॉ. साजीद चाऊस यांनी आपला शैक्षणिक प्रवास सांगताना शिक्षक-विद्यार्थी नात्याचा पाया विश्वास,आदर आणि परस्पर संवाद असल्याचे सांगितले.या नात्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक आणि भावनिक विकासालाही चालना मिळते,असे ते म्हणाले. शिक्षकांचे मनोगत व्यक्त करताना डॉ.दत्ता साकोळे,डॉ.चिंते आणि डॉ.जाधव यांनी शिक्षक-विद्यार्थी नात्यातील बदलावर प्रकाश टाकला.सकारात्मक संबंध शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजा व शैक्षणिक प्रवासातील आव्हाने समजून घेण्यासाठी मदत करतात. ही समज योग्य मार्गदर्शन व अनुकूल शिक्षण वातावरण तयार करण्यास सहाय्यक ठरते.त्यामुळे संवादासाठी खुले वातावरण निर्माण होऊन विद्यार्थी आपले विचार,प्रश्न आणि चिंता मुक्तपणे मांडू शकतात. विद्यार्थिनी माधवी शिनगारे हिने प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांनी सांगितले की, “निरोगी व विश्वासू वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक व शैक्षणिक संघर्षांबाबत बोलण्यास सोयीस्कर वाटते. त्यामुळे ते मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बळकट होतात. विद्यार्थ्यांचा हा सर्वांगीण विकास त्यांच्या एकूण कल्याणास हातभार लावतो आणि मानसिक आरोग्य सुधारतो. यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.” या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक अर्चना मुखेडकर व सांस्कृतिक विभाग प्रमुख दत्ता साकोळे यांनी केले.व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ.दादाराव गुंडरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.ताटिपामुल, डॉ.महाजन,डॉ.राठोड,डॉ.सूर्यवंशी, डॉ.मीनाक्षी जाधव,डॉ.सरवदे,डॉ. काकडे,डॉ.लोहकरे,प्रा.वाघमारे, प्रा.पांचाळ,प्रा.पंडित, डॉ. अंकुशराव,डॉ.अदाटे,प्रा.सुरनर,डॉ.मानेकर,प्रा.वायभसे,डॉ. चंदनशिवे,प्रा.शेख, प्रा.पालकर, डॉ.बालाजी वाघमारे, प्रा.गपाट, प्रा.वाकडे, प्रा.कापसे, प्रा.पाटील, प्रा. तांबोळी व प्रा.सागर पालके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी टेकाळे यांनी केले. प्रास्ताविक आकाश बारसकर यांनी तर आभार प्रदर्शन मयुरी कोल्हे यांनी केले.प्रसिद्धी प्रमुख म्हणून झीनत मुल्ला व तेजस्विनी गुजर यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधीक्षक हनुमंत जाधव,इकबाल शेख,संदीप सूर्यवंशी तसेच सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड