February 9, 2026

“ढोकी स्टेशनवर एक्सप्रेस,मेल व वंदे भारत गाड्यांना थांबा द्या” – रेल्वे कृती समितीची मागणी

  • कळंब – ढोकी व कळंब रेल्वे कृती समिती तर्फे ढोकी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस,मेल तसेच वंदे भारतसह सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी ठाम मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
    ढोकी परिसरासह कळंब, केज, शिराढोण,मोहा,पारा आदी भागातील प्रवाशांना सध्या रेल्वे पकडण्यासाठी धाराशिवपर्यंत प्रवास करावा लागतो.ढोकी स्टेशनवर थांबा मिळाल्यास जनतेचा वेळ व पैसा वाचणार असून प्रवास अधिक सुलभ होईल,असे समितीने स्पष्ट केले आहे.
    यासंदर्भात सोलापूर विभागीय रेल्वे वाणिज्य प्रबंधक (Sr. DCM) योगेश पाटील यांची भेट घेऊन डॉ.रामकृष्ण लोंढे व राहुल वाकुरे पाटील यांनी समितीच्या वतीने निवेदन सादर केले.
    या मागणीला कळंब आडत व्यापारी महासंघ,तालुका व्यापारी महासंघ,डॉक्टर संघटना,औषध विक्रेता संघ,सराफ-सुवर्णकार असोसिएशन,राजमाता अहिल्यादेवी होळकर संघ, क्रांतीसूर्य महात्मा फुले समिती, विधीज्ञ संघ,रोटरी क्लब, इनरव्हील क्लब,पत्रकार संघ, शिक्षक संघ आदींचा पाठिंबा मिळाला आहे.याशिवाय खासदार ओमराजे निंबाळकर व बजरंग बप्पा सोनवणे यांची शिफारसपत्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली.
    कृती समितीने रेल्वे प्रशासनाला सादर केलेल्या मागणीत सांगितले की,ढोकी थांबा सुरू झाल्यास रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल आणि प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होईल. प्रायोगिक तत्वावर किमान पाच ते सहा महिन्यांसाठी थांबा सुरू करून त्याची व्यवहार्यता (Feasibility) तपासावी,आणि नंतर कायमस्वरूपी थांबा मंजूर करावा,अशी मागणी समितीने केली.
    या निवेदनावर उत्तर देताना Sr. DCM योगेश पाटील यांनी –
    “ढोकी थांब्याबाबतची संपूर्ण माहिती गोळा करून प्रत्यक्ष परिस्थिती तपासून पाहूनच योग्य निर्णय घेतला जाईल,”असे आश्वासन दिले.
error: Content is protected !!