धाराशिव (जिमाका) – जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून सन २०२४ -२५ अंतर्गत शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत आहे.योजनेत २७४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.नव्या सिंचन विहीरीसाठी ९० कामांपैकी ४८ कामे पूर्ण झाली आहे. तर उर्वरित कामे सुरू आहेत. महाडीबीटी पोर्टलवरून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने पारदर्शकता वाढली आहे.या उपक्रमामुळे जिल्ह्यात १०० हेक्टर क्षेत्राला हंगामी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून शेतकरी शाश्वत उत्पन्नाकडे वाटचाल करत आहेत. शासनाने या योजनांतर्गत अनुदान मर्यादा दुप्पट केली असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. याशिवाय जि.प. सेस योजना २०२४ -२५ अंतर्गत चाफकटर,५ एचपी पानबुडी, पीव्हीसी पाईप, टोकन यंत्र,फवारणी पंप,ब्रशकटर, सोलार इन्सेक्ट ट्रॅप आणि स्लरी फिल्टर यांसारखी साधने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. त्याचबरोबर बायोगॅस व नविन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ११४ बायोगॅस संयंत्र उभारण्यात आली असून ती कार्यान्वित आहेत.यामुळे जळाऊ लाकडाचा वापर घटला,वृक्षतोडीवर नियंत्रण आले तसेच घरगुती एलपीजी खर्चात बचत झाली आहे. बायोगॅस स्लरीचा उपयोग करून शेतकरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिके घेत आहेत. दरम्यान,खरीप हंगाम २०२५ साठी कृषी आयुक्तालयामार्फत ८५ हजार ८४५ मेट्रिक टन खताचे आवंटन झाले असून त्यापैकी ६२५७ मेट्रिक टन अनुदानित खताचा पुरवठा धाराशिव जिल्ह्यात झाला आहे.आतापर्यंत ३२७९ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून मार्चअखेर जिल्ह्यात ३४ हजार ५९८ मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक होता.सध्या एकूण ३६ हजार ५७६ मेट्रिक टन खत उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पुरेसा साठा उपलब्ध राहणार आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान