धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात शेती व सहकार क्षेत्रासाठी विविध महत्त्वाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अल्पमुदत पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. जिल्ह्यातील ४७ हजार ४२० लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी ४६ हजार ६१९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आतापर्यंत ४४ हजार ७३९ शेतकऱ्यांना १३० कोटी ७७ लाखांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. यासोबतच,जिल्ह्यातील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सक्षमीकरण व पुनरुज्जीवन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून सहा बैठका घेण्यात आल्या आहेत.या बैठकीत कर्ज थकबाकी वसुलीसाठी ठोस निर्देश देण्यात आले आहेत. कृषी बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबविण्याचे कामही गतीमान झाले आहे.जिल्ह्यातील कळंब आणि मुरूम बाजार समित्यांमध्ये पूर्वीपासूनच ई-नामची अंमलबजावणी सुरू होती.ऑगस्ट २०२३ मध्ये तुळजापूर व उमरगा बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला.त्यामुळे जिल्हा राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑनलाइन नेटवर्कमध्ये जोडला गेला असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अधिक चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. उर्वरित बाजार समित्यांचा समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत जिल्ह्यातील ११ हजार ५३७ पात्र शेतकऱ्यांना मार्च २०२५ अखेर १ कोटी ३६ लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे.मात्र,आणखी २२ हजार ३२६ शेतकऱ्यांना २ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी अभावी लाभ प्रलंबित आहे.सन २०२५-२६ करीता अंदाजे ४ कोटी ८० लाखांचा निधी आवश्यक असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील सहकारी विकास संस्थांच्या संगणकीकरणाला गती मिळाली आहे.एकूण ४६९ विकास संस्थांपैकी १५६ संस्थांची निवड झाली असून त्यातील १५३ संस्थांना संगणक प्राप्त झाले आहेत.७१ कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना e-PACS घोषीत करण्यास मान्यता देण्यात आली असून प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. सध्या ७० संस्थांनी Common Service Center (CSC) मार्फत ऑनलाइन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील शेतकरी व सहकार क्षेत्र अधिक बळकट होऊन शेतकऱ्यांना सुलभ,पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा मिळणार आहेत.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान