कळंब (माधवसिंग राजपूत) – मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात १४ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वासिरा व मांजरा नदीने रौद्ररूप धारण केले. नदीपात्र सोडून पाणी शिवारात व गावात घुसल्याने शेतीतील पिके, जनावरांचे गोठे,कडब्याच्या गंजी तसेच शेतमजुरांची घरे वाहून गेली. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या ईटकुर व खोंदला गावातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.मात्र,खोंदला येथील शेतकरी सुब्राव लांडगे हे सकाळी शेतातून परतत असताना गावाजवळील पुलावरून वाहणाऱ्या प्रचंड प्रवाहात सापडले.प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. या घटनेनंतर परिसरात भयानक पूरस्थिती निर्माण झाली असून शासन स्तरावरून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच आ. राणाजगजितसिंह पाटील,आ. कैलास घाडगे पाटील,शिवसेना नेते अजित पिंगळे,ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन काळे, उपविभागीय अधिकारी संजय पाटील,तहसीलदार हेमंत ढोकले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, नितीन काळे व मकरंद पाटील यांनी दुपारी पूरस्थितीची माहिती घेतली. रेस्क्यू टीमच्या मदतीने ड्रोन व बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम राबविण्यात आली,मात्र १४ ऑगस्ट संध्याकाळपर्यंत हरविलेल्या शेतकऱ्याचा शोध लागला नाही.१५ ऑगस्ट रोजी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान,धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता धरणात ६४१.६५ मीटर पाणीसाठा नोंदला गेला असून तो एकूण क्षमतेच्या ८२.७८% इतका आहे.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ (लातूर विभाग क्र. १) च्या निवेदनानुसार,आगामी दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने धरणातून विसर्ग करावा लागू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका असल्याचे इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड