September 24, 2026

‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचे हटके आंदोलन

  • पत्त्यांचा डाव,अघोरी पूजा आणि ड्रग्ज-पैसे वाटपाचा प्रतिकात्मक निषेध

  • धाराशिव –महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अनोखे व हटके आंदोलन करण्यात आले.मंत्र्यांना ‘कलंकित’ आणि मुख्यमंत्र्यांना ‘हतबल’ संबोधत केलेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
    या आंदोलनास आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार दयानंद गायकवाड, जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रतिकात्मक टीका करण्यासाठी आंदोलकांनी पत्त्यांचा डाव खेळला, पैसे आणि ‘ड्रग्ज’चे प्रतिकात्मक वाटप केले.
    माजी कृषिमंत्री व आताचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधत पत्याचा खेळ रंगविण्यात आला. मंत्री भरत गोगावले यांना ‘जादूटोणा करणारे मंत्री’ म्हणून संबोधत त्यांच्या नावाने अघोरी पूजा मांडण्यात आली व “ओम भट स्वाहा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध म्हणून ‘ड्रग्ज’ लिहिलेल्या पुड्या फेकण्यात आल्या.
    सरकारविरोधी घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन “कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री” अशा घोषणांचा गजर करण्यात आला. आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!