August 8, 2025

कळंब बसआगारात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – कळंब बसआगार कर्मचारी जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.
    या निमित्ताने श्री दत्त मंदिर सभागृहात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब बसआगार प्रमुख खताळ एस.डी. हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा संघटक अतुल गायकवाड,प्राचार्य जगदीश गवळी,गुणवंत कामगार असोसिएशनचे प्रदेश सचिव अच्युतराव माने,वाहतूक निरीक्षक निलेश जाधव, सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत,सामाजिक कार्यकर्ते उदय खंडागळे,सचिन क्षिरसागर व बहुजन जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे यांची उपस्थिती लाभली.
    कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सभागृहात प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.
    प्रमुख वक्ते प्राचार्य गवळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विद्रोही लेखनशैलीचा उल्लेख करताना सांगितले की, “साठे यांचे साहित्य ही विषम समाजव्यवस्थेविरुद्धची लढाई होती. दीड दिवस शिक्षण घेऊन त्यांनी समाजाला दिशा देणारे प्रभावी साहित्य निर्माण केले.”
    अतुल गायकवाड यांनी आपल्या भाषणात साठे यांचे कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील योगदान अधोरेखित करत त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा व्हावा, अशी मागणी केली.
    पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी साठे यांच्या वास्तववादी लेखनाचा गौरव करत सांगितले की, “त्यांच्या कादंबऱ्यांमधून समाजातील बंडखोर नायक समोर आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी गायलेला पोवाडा रशिया देशातही गाजला.”
    सचिन क्षिरसागर यांनी साठे यांचे विशाल व्यक्तिमत्त्व समाजाला समजून घेण्यात आलेले अपयश हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली, तर अच्युतराव माने यांनी साठे यांच्या कामगारहितैषी कार्यामुळे आज अनेक सवलती उपलब्ध झाल्या आहेत, याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध रणदिवे यांनी तर आभार गवळी मॅडम यांनी मानले.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंती उत्सव समितीचे मनोज मुळे,आबासाहेब चौधरी, अकाउंटंट कांबळे,गवळी मॅडम, सोनवणे मॅडम यांच्यासह कळंब बसआगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!