मुंबई – “एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो,ही बाब अभिमानास्पदच आहे.कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तुत्वाने मोठा होऊ शकतो, हि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीची सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गौरवाचा उल्लेख केला. दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी पूर्ण होत असून, त्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध विभागाचे मंत्री यांच्यासह गटनेते व सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दानवे यांच्या विरोधी पक्षनेते म्हणून ४४ दिवसांची कार्यकाळ शिल्लक आहे. परंपरेनुसार अधिवेशन काळात हा निरोप समारंभ होतो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचे आम्ही मन:पूर्वक कौतुक करतो.” ते पुढे म्हणाले, श्री. दानवे यांचे राजकीय आणि शैक्षणिक योगदान अधोरेखित करताना मुख्यमंत्री म्हणाले, “योगशास्त्रात एम.ए., पत्रकारितेचा अनुभव आणि मराठवाडा विभागातील बारावीमध्ये गुणवत्तायादीत सहावे स्थान मिळवणारा हा युवक पत्रकारितेचा मार्ग सोडून विधिमंडळाला एक उत्कृष्ट नेता मिळाला.” “जनतेच्या प्रश्नांची समज, ठाम भूमिका, विविध संस्थांबरोबर सामाजिक, क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य, यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आंदोलने उभारून ती यशस्वी केली. त्यांच्या या प्रवासाला आम्ही सलाम करतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार आदींनी विरोधी पक्षनेते श्री दानवे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती