August 9, 2025

संविधान समता दिंडीचा समारोप

  • पंढरपूर – जातीय,धार्मिक द्वेषाने मलिन झालेली मन शुद्ध करून त्या मनात समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची चेतना निर्माण कर,असे साकडे संविधान समता दिंडीच्या वारकऱ्यांनी पंढरपूरच्या पाडुरंगाला घातले.त्यासाठी आषाढी एकादशीचे पुण्य आम्ही पाडुरंगाच्या चरणी अर्पण करीत आहोत,अशी घोषणाही या वारकऱ्यांनी केली.
    संविमता दिंडीचा समारोप शनिवारी पंढरपूर येथील तुकडोजी महाराज मठात झाला. अध्यक्षस्थानी धर्मकीर्ती महाराज परभणीकर होते.तर कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव,तुकडोजी महाराज विचार प्रसारक ज्ञानेश्वर महाराज रक्षक,सेवकराम मिलमिले, अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील,शिक्षण तज्ञ दादासाहेब रोंगे,डाॅ.रफिक सय्यद,दादा महाराज पनवेलकर, समता दल सैनिक,पंकज पाल महाराज,राम पाल महाराज,रवी दादा मानव,संविधान संवादक राजवैभव,अमोल पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी संविधान समता दिंडीला विरोध करणारांचा जोरदार समाचार घेतला.संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज,नामदेव महाराज, जनाबाई आदी संतांना ज्यांनी त्रास दिला,त्याच प्रवृत्ती आजही जिवंत आहेत.त्याच संविधान समता दिंडीला विरोध करत आहेत. कारण संत विचार आणि संविधान एकच आहे. विरोध करणाराला विरोध करू द्या,आपण संतांचे कार्य पुढे घेऊन जाऊ त्यातून आनंदी समाज निर्माण होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    प्रस्ताविक शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.सूत्रसंचालन हरिदास महाराज तम्मेवार यांनी तर आभार प्रदर्शन भारत महाराज घोगरे गुरुजी यांनी केलै.इंजि. भाऊ थुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित भजन सादर केली. यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान समता दिंडीची आज असलेली गरज अधोरेखित केली.संतांनी समतेचा जागर केला.म्हणून त्या काळी संतांना त्रास सहन करावा लागला. तुकाराम महाराज यांची गाथा बुडविली,नामदेव महाराज यांना कीर्तन करण्यास बंदी केली. त्याच प्रवृत्ती आज संविधान समता दिंडीला विरोध करीत आहेत. कारण त्यांची मनं जातीय,धार्मिक विद्वेषाने मलिन झाली आहेत. पांडुरंगाने ती दुषित झालेली मनं शुद्ध करावीत,त्यासाठी उद्या आषाडी एकादशीचा उपवास केल्यानंतर होणारे पुण्य आम्ही पाडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहोत,असा संकल्प सर्वांनी केला.
error: Content is protected !!