लातूर – “आपल्या व्यवसायावर श्रद्धा ठेवूनच जीवनाचा अर्थ सापडतो.पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला ओळखणारी माणसेच आपली खरी ओळख आहे.म्हणूनच आपण या पृथ्वीतलावर ‘पाहुणे’ म्हणूनच राहायला पाहिजे,” असे समर्पक प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभाग (डायट) लातूरचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेश गोरे यांनी केले.
किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव काळे अध्यापक विद्यालय,लातूर येथे दि. २० जून २०२५ रोजी त्यांच्या बदलीनिमित्त शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात लातूर विभागातील विविध अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मूल्यमापन अधिकारी प्रा.योगेश्वरी नाडे यांनी केले. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “आपल्या कामावर शतदा प्रेम करुनच ते यशस्वी कसे करायचे,याचा आदर्श डॉ.गोरे यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.त्यांच्या सहवासात राहून आपल्याला कर्तव्यदक्षता,समर्पण आणि संयमाची शिकवण मिळाली आहे.” तद्नंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ.राजेश गोरे म्हणाले, “माणूस म्हणूनच आपली खरी ओळख आहे. म्हणूनच कोणत्याही पदावर असताना आपली जबाबदारी पार पाडताना आपण ‘माणूस’ म्हणूनच वागले पाहिजे. आपले कार्यच आपली ओळख आहे. आपल्याला घडवणारी आपली संस्था आहे,सहकर्मी आहेत,विद्यार्थी आहेत.त्यांच्या सहवासातच आपली घडण होते, म्हणूनच आपले प्रत्येक कार्य श्रद्धा आणि समर्पणाने करायला हवे.”
याप्रसंगी ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ कापसे,मूल्यमापन अधिकारी प्रा.योगेश्वरी नाडे, सहमूल्यमापन अधिकारी प्रा. पद्माकर कोलतमे, सहमूल्यमापन अधिकारी प्रा.अरुण चौधरी या मान्यवरांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.आपल्या आपुलकीने या मान्यवरांनी डॉ. गोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. समारंभाच्या निमित्ताने तत्पर सेवेसाठी ओळखले जाणारे सेवक अप्पा देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे बहुजनांच्या हक्कांसाठी अविरत लेखणी चालवणारे व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक स्वप्नपूर्तीसाठी समर्पित राहणारे निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीतून साकारलेले सा.साक्षी पावनज्योत या वृत्तपत्राचा डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांक,भैरवनाथ अध्यापक विद्यालय,कळंबचे प्रा.अविनाश घोडके यांनी डॉ.राजेश गोरे, डॉ. जगन्नाथ कापसे व प्रा.योगेश्वरी नाडे यांना सप्रेम भेट म्हणून प्रदान केला.
कार्यक्रमाचे भारदस्त सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे यांनी केले.
More Stories
मध्यवर्ती बसस्थानक,जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर
“सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन” – शिक्षक आमदार विक्रम काळे
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना लातूर येथे अभिवादन