कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – शहरातील मोंढा येथे हमाली करणारे ज्ञानेश्वर (माऊली) सातपुते यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. आपल्या मुलीला मोठं करायचं, तिला पोलीस व्हायचं! स्वतःच्या घामाचे कण मोजणारा तो बाप, जेव्हा आपली मुलगी आश्विनी ला खाकी वर्दीत पाहतो,तेव्हा त्याच्या डोळ्यातून अभिमानाचे अश्रू अनावर होतात. प्रत्येक बापाची हिच माफक पण मोलाची अपेक्षा असते – “मुलीने शिकून स्वतःचं स्थान निर्माण करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं!” आश्विनीने ही अपेक्षा पूर्ण करत, बापाच्या स्वप्नांना वास्तवाची डोळस किनार दिली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अहोरात्र राबत, हमाली करत मुलीच्या शिक्षणाचा भार उचलला.दुसरीकडे आश्विनीनेही वडिलांच्या कष्टांची किंमत ओळखून,परिश्रमांची पराकाष्ठा करत पोलीस पद मिळवलं.तिचा दीक्षांत समारंभ नागपूर येथे पार पडला, आणि त्याच क्षणी तिचे वडील – माऊली – गर्वाने फुलून गेले.पोलीस वर्दीतली आपली लेक पाहून त्यांच्या डोळ्यांतून अभिमानाचे अश्रू ओघळले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातला ‘सुवर्णक्षण’ ठरला – जो ते कधीच विसरू शकणार नाहीत. “मुलगी मोठी व्हावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी,” हे प्रत्येक बापाचे स्वप्न असते. आश्विनीने ते खरं करून दाखवलं. आज माऊली सातपुते हे केवळ हमाल नाहीत,तर एका पोलीस लेकीचे अभिमानी वडील आहेत, आणि संपूर्ण गावासाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.ह्या यशामुळे माऊली सातपुते यांचे प्रतिष्ठित व्यापारी निलेश होनराव, प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,ज्ञानदा सामाजिक संस्थेच्या व परिसरातील नागरिकाकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
More Stories
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा
विद्याभवन हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा