मुंबई – डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर सिंधु पुत्राचे नाव. श्री.करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील. आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना श्री. करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच श्री. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले. सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहात असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये करंदीकर यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशांसाठी करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असा एकूण २० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. सदानंद करंदीकर ८२ वर्षांचे आहेत. सध्या ते बहिण प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे राहतात. वृध्दाश्रम, कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबीयांची धावपळ यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सिंधुदुर्ग सुपूत्र श्री. सदानंद करंदीकर यांनी सागरा प्रमाणेच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचे आपले दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन