June 26, 2025

माळकरंजा येथे नृसिंह सप्ताहास उत्साहात सुरुवात

  • माळकरंजा (सुदर्शन जाधव ) – तालुक्यातील माळकरंजा येथे दिनांक ३ मे २०२५ पासून नृसिंह सप्ताहास प्रारंभ झाला असून, संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालेलं आहे.हा सप्ताह ११ मे पर्यंत चालणार असून,यानंतर १२ मे रोजी नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
    सुमारे ५०० वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या सप्ताहाला तालुक्यातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून ओळख मिळाली आहे.भक्ती,श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम असलेला हा सप्ताह गावकऱ्यांसाठी तसेच पंचक्रोशीतील भाविकांसाठी आत्मिक ऊर्जा देणारा ठरतो.
    या वर्षी सप्ताहाच्या निमित्ताने नूतनीकरण करून भव्यतेने सजवलेले ‘अभेद्य नृसिंह प्रवेशद्वार’ भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.प्रवेशद्वारापासून ३०० मीटर अंतरापर्यंत रंगीबेरंगी आकर्षक लायटिंगमुळे संपूर्ण मार्ग दिव्य तेजाने उजळून निघाला आहे.
    या पवित्र सप्ताहात संपूर्ण गाव एकत्र येऊन पंक्ती भोजनाची परंपरा जपली जाते.भक्तांसाठी आयोजन केलेले पंगत भोजन भक्तीचा आणि एकात्मतेचा अनुभव देत आहे.
    सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी श्री.नृसिंह महाराजांचे दर्शन घेतले.दररोज धार्मिक कार्यक्रम,कीर्तन,प्रवचन आणि महाप्रसादाच्या आयोजनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
    १२ मे रोजी नृसिंह जयंती निमित्त विशेष महापूजा,अभिषेक, पालखी सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री नृसिंह महाराजांच्या कृपाप्राप्तीसाठी भक्तगण आसूसलेले असतात.
    संपूर्ण माळकरंजा गाव उत्साहात असून,देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रत्येकजण एकाग्रतेने सेवा करत आहे. अध्यात्म,संस्कृती आणि परंपरेचं एक सुंदर रूप या सप्ताहात पाहायला मिळत आहे.
error: Content is protected !!