कळंब – येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष पांडूरंग कुंभार यांनी केला आहे.त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून शासन निर्णयाच्या विरोधात काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर चौकशी समिती नेमण्याची आणि तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. कुंभार यांच्या म्हणण्यानुसार, कळंब नगर परिषद हद्दीतील ६८ कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत रस्ते विकास कामे व जलवाहिनी खोदकामासंबंधीचा शासन निर्णय क्रमांक २३९/ति-३३,दिनांक ११ मे २०१७ च्या अन्वये स्पष्ट निर्देश आहेत की, शहरातील पाणी पुरवठा, जलवाहिनी,मलनिस्सारण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच रस्ते बांधकामे करावीत.परंतु,या निर्णयाला डावलून मुख्याधिकारी गुरमे यांनी जाणिवपूर्वक रस्ते विकास कामे सुरू ठेवली,असे निवेदनात म्हटले आहे.या कामांसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध असताना देखील मुख्याधिकाऱ्यांनी नगर अभियंत्याच्या सुचनेविना व केवळ गैरशासकीय संकेतावर कामे सुरू केली.या कामांमुळे भविष्यात पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते पुन्हा खोदण्याची वेळ येणार असून, अनावश्यक खर्च होणार आहे. यापूर्वीही विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार झालेल्या चौकशी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती,असा आरोपही केला आहे.मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी,शासन निर्णय धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी आणि चौकशी समिती स्थापन करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,अशी मागणी काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी केली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात