धाराशिव (जिमाका)- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये रांगोळी स्पर्धा,पोस्टर स्पर्धा, पथनाट्य,जनजागृती रॅली यांचा समावेश असून,हे कार्यक्रम आरोग्यवर्धिनी केंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,नागरी आरोग्य केंद्र तसेच तालुका व जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. क्षय (TB) हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. १८८२ मध्ये रॉबर्ट कॉक यांनी या जीवाणूचा शोध लावला,त्यानिमित्त २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. क्षयरोगाची प्रमुख लक्षणे ही मुख्यतः दोन आठवड्यांहून अधिक खोकला,ताप,वजन घटणे,भूक न लागणे,मानेवर गाठी, रक्तमिश्रित थुंकी अशी असून,अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी जावे. क्षयरोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा हात वापरावा.संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करावा.क्षयरोग निदान व उपचार सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. धाराशिव जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलन प्रगती पुढीलप्रमाणे आहे.जिल्ह्यात २०२४ मध्ये ६० हजार ७८९ संशयित क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट होते,मात्र प्रत्यक्षात ६४ हजार २२४ संशयित रुग्ण शोधून १०६ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. राज्यस्तरावर धाराशिव जिल्हा पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये अग्रस्थानी आहे.तालुका निहाय क्षयरुग्ण शोधण्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:कळंब –४०५० प्रति लाख लोकसंख्या,लोहारा– ४१२९ प्रति लाख लोकसंख्या,धाराशिव – ३,६९९ ,प्रति लाख लोकसंख्या, तुळजापूर –३२७८ प्रति लाख लोकसंख्या,परंडा –२८८६ प्रति लाख लोकसंख्या अशी आहे. क्षयरुग्णांना दरमहा १००० रुपये पोषण सहाय्य (DBT) द्वारे दिले जाते.९० टक्के रुग्णांचे बँक खाते उपलब्ध असून,६० टक्के रुग्णांना अनुदान वाटप पूर्ण झाले आहे.औषध उपचारादरम्यान आशा कार्यकर्त्या ट्रीटमेंट सपोर्टर म्हणून कार्य करतात. टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमात धाराशिव जिल्ह्याची आघाडी असून राज्यस्तरावर ३५० ग्रामपंचायतींना टीबी मुक्त करण्याचे उद्दिष्ट होते,मात्र जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींसह एकूण ३८० ग्रामपंचायती टीबी मुक्त घोषित करण्यात आल्या. रुग्णांना पोषण आहारास मदत करण्यासाठी ‘निक्षय मित्र’ नोंदणी सुरू आहे.इच्छुक व्यक्ती किंवा संस्था तपासणीसाठी गहू,ज्वारी,डाळ,तेल,दूध पावडर,गूळ,शेंगदाणे यासारखे अन्नधान्य सहाय्य करू शकतात.८८ टक्के क्षयरुग्णांनी निक्षय मित्र योजनेत संमती दिली आहे. जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि टीबी मुक्त भारत अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला