धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून लाळखुरकत रोगावरील लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून, पुढील ४५ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे.यासाठी ५ लाख ५० हजार ५०० लसींची उपलब्धता झाली आहे.प्रशासनाने पशुपालकांना त्यांच्या पशुधनाचे वेळेत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. लाळखुरकत हा विषाणूजन्य रोग असून,संसर्ग झाल्यास पशुधनाला १०५ ते १०६ डिग्री ताप,तोंड व खुरांमध्ये जखमा होतात.यामुळे जनावरे खाणे-पिणे बंद करतात,त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि दुग्ध उत्पादनात घट होते.गर्भवती गायी,म्हशी व शेळ्यांमध्ये गर्भपाताची शक्यताही असते.हा रोग हवेद्वारे वेगाने पसरतो,त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील लसीकरण मोहीम १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत राबविली जात आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील ३९ हजार पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.उर्वरित पशुपालकांनी तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील एकही पशुधन लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांना सक्त सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला