लातूर – राज्यस्तरीय शीलरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याने जबाबदारी वाढली असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केले. भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे व छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून राज्यस्तरीय शीलरत्न पुरस्कार श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई यांना दलित पॅंथरचे राज्य उपाध्यक्ष डी.एस.नरसिंगे यांच्या हस्ते सहकुटुंब शाल, सन्मानचिन्ह,मानपत्र आणि पुष्प गुच्छ देऊन नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. हा पुरस्कार वितरण सोहळा श्रावस्ती बुद्ध विहार,विक्रम नगर, लातूर येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड हे उपस्थित होते तर विचारमंचावर देविदास बाबा आचार्य, डॉ. विजय अजनीकर,सुजाता अजनीकर,व्ही.एम.भोसले, विलास घारगावकर,प्रा. शिवशरण हावळे,रणजीत आचार्य,डॉ.राहुल डोंबे,सुनील मांदळे,रुपेश गायकवाड,राहुल कांबळे,कुसुम बानाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्व मानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचशील गायक मंडळ, बुधोडा येथील महेंद्र गडेराव, माया गडेराव व चमुनी बुद्ध भीम गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.संजय गवई म्हणाले की, सामाजिक कार्याची मनस्वी तळमळ असल्याने मी सातत्याने कार्य करीत राहिलो.अहंकार न बाळगता माणसे जोडत राहिलो. त्यामुळे सामाजिक चळवळीमध्ये जीवाभावाचे अनेक मित्र, सहकारी तयार झाले.त्यांना सोबत घेऊन सामूहिकपणे समाजकार्य करण्यातच मला समाधान वाटते.हा आपण केलेला सन्मान केवळ एक व्यक्ती म्हणून माझा एकट्याचा नव्हे तर आंबेडकरी विचाराच्या समग्र कार्यकर्त्यांचा आहे असे मी मानतो.येणाऱ्या काळातही मला आपल्याकडून भरभरून प्रेम, शुभेच्छा,आशीर्वाद मिळावेत हीच अपेक्षा आहे. अध्यक्षपदावरून बोलताना माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड म्हणाले की,ज्या समाजामध्ये सदगुणांचा सत्कार होतो.त्या समाजाचे भवितव्य उज्वल असते.बिन बांधिलकीची प्रवृत्ती घातक स्वरूपाची ठरते.प्राचार्य डॉ.संजय गवई यांच्याकडे आपण केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता, विचार दृष्टिकोन म्हणून पाहतो. लोकशाहीमध्ये संघटनात्मक शक्तीच्या जोरावर जो वर्ग आपला प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी होतो.त्या वर्गाच्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. हे ओळखून उपेक्षित समाज घटकांनी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय बनावयास हवे. लहान मोठ्या संघटनांनी एकत्रित येऊन व्यापक लढा उभा करावयास हवा.हे स्पष्ट करून त्यांनी आंबेडकरी चळवळीचा धावता आढावा घेतला. या कार्यक्रमाला डॉ.लहू वाघमारे, प्रा.नागोराव कांबळे,धम्मपाल सावंत,आर.पी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा.कल्याण कांबळे, आनंद डोनेराव,प्रा.संजय गायकवाड,प्रा.विशाल लामतुरे, ममता गवई,संयम गवई,सुमित गवई,सार्थक गवई यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मांदळे यांनी केले तर मानपत्र वाचन डॉ.राहुल डोंबे यांनी केले आणि आभार सुनील मांदळे यांनी मानले.कार्यक्रमाला लातूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे