August 8, 2025

कै.सुमनआई मोहेकर:शांत,सयंमी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व – विश्वनाथ वाघमारे

  • कै.सुमनआई मोहेकर हे केवळ नावच नव्हे,तर निस्वार्थ सेवा आणि माणुसकीचा आदर्श म्हणून ओळखल्या जात.त्या कधीही कोणावर रागावल्या नाहीत,त्यांचा शांत,सयंमी आणि प्रेमळ स्वभाव हा साऱ्यांसाठी प्रेरणादायी होता.वस्तीगृहातील मुलांना त्यांनी आपल्या मुलांप्रमाणेच जपले.स्वयंपाक करून त्यांना खाऊ घालणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे त्या नेहमीच करत असत.
    १९८९ पासून सुमनआई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे प्रयोगशाळा सहाय्यक विश्वनाथ वाघमारे यांनी आपल्या अनुभवांतून सुमनआईंच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले आहे. ते सांगतात की,मी १९८९ पासून सुमनआईंचा सेवक म्हणून सेवा करत आहे.त्या नेहमी प्रेमाने आणि जिव्हाळ्याने वागायच्या. मी त्यांना काकू म्हणत असे, आणि त्या मला आपल्या परिवाराचा भाग मानत. काम संपल्यानंतरही मी त्यांच्यासोबत वेळ घालवत असे, पण त्यांनी कधीच त्रासिकपणा दाखवला नाही.उलट त्या नेहमी म्हणायच्या, जा घरी, आराम कर. त्यांच्या बोलण्यात नेहमीच मृदूता आणि आपुलकी असायची.

  • सुमनआईंचा स्वभाव कधीही कठोर नव्हता.संकटे कितीही आली तरी त्या शांतपणे त्याचा सामना करत.त्यांनी केवळ शब्दांनी नव्हे,तर कृतीतून माणुसकीचा आदर्श जगासमोर ठेवला.वस्तीगृहातील मुलांच्या भल्यासाठी त्या अहोरात्र झटत, त्यांना केवळ अन्नच नाही,तर प्रेमाचा आणि आधाराचा अनुभव मिळावा,यासाठी त्या प्रयत्नशील होत्या.
    विश्वनाथ वाघमारे पुढे म्हणतात, सुमनआईंचा स्वभाव हा एक शाळा होता.त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर मी सहनशीलता, शांतता आणि प्रेमाने कसे वागावे, हे शिकलो.त्यांनी मला नेहमीच आदराने वागवले आणि कधीही रागावल्या नाहीत.त्यांच्या शिकवणुकीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे.
    कै.सुमनआई मोहेकर यांच्या जीवनातील हे प्रसंग त्यांची उदारता,प्रेमळपणा आणि सेवा वृत्ती यांचे साक्ष आहेत.त्यांचा शांत आणि सयंमी स्वभाव आजही त्यांच्या सहवासात राहिलेल्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरतो.त्यांच्या शिकवणुकीचा आणि आठवणींचा प्रत्येकाच्या मनावर गोड ठसा उमटलेला आहे.
    कै.सुमन काकू मोहेकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त माझे विनम्र अभिवादन..!
  • शब्दांकन – प्रा.अविनाश रंजना सुभाष घोडके
    भैरवनाथ अध्यापक विद्यालय,कळंब
error: Content is protected !!