जीवनात वडिलांचा आधार हरवणे ही एक अतिशय कठीण आणि वेदनादायक घटना असते. माझे वडील,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी अर्थात आण्णा,हे केवळ आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.आण्णांनी शिक्षण प्रसारासाठी दिलेलं योगदान आणि समाजसेवेचा ध्यास हा आमच्या कुटुंबाचा आत्मा होता.परंतु,दि.३० ऑगस्ट १९९१ रोजी आण्णांचे निधन आमच्यासाठी मोठं दुःख आणि जबाबदारीची जाणीव घेऊन आलं.अशा कठीण काळात माझ्या आईसाहेब माझा खरा आधार बनल्या. आईसाहेबांनी,आण्णांच्या जाण्यानंतर मला केवळ धीर दिला नाही,तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन केलं.आण्णांच्या जाण्याने आलेल्या पोकळीला आईसाहेबांनी त्यांच्या कणखर मनोवृत्ती आणि निस्वार्थ प्रेमाने भरून काढलं.त्या फक्त आई नव्हत्या,तर एक मार्गदर्शिका,एक शिक्षिका आणि एक प्रेरणास्थान होत्या. आईसाहेबांनी मला शिकवलं की जीवन कितीही कठीण असलं तरी त्याला सामोरं जाणं आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हेच खरे यश आहे.त्यांनी मला आयुष्याच्या चढ-उतारांशी सामना करण्यासाठी धैर्य दिलं आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलं.आण्णांच्या स्वप्नांना पुढे नेण्यासाठी आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी आईसाहेबांचं धैर्य,समर्पण,आणि प्रयत्न अवर्णनीय आहेत. आईसाहेबांचं मार्गदर्शन केवळ कुटुंबापुरतं सीमित नव्हतं.त्या नेहमी म्हणायच्या की “शिक्षण हेच खऱ्या प्रगतीचं साधन आहे,” आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिलं.त्यांच्या शिकवणींमुळेच आज मी माझ्या निर्णयांमध्ये ठाम आणि जबाबदार आहे.त्या नेहमी म्हणायच्या की,आण्णांनी जे शिक्षणासाठी स्वप्न पाहिलं,ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे.आणि याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही कुटुंब म्हणून कार्य करत राहिलो. आईसाहेबांनी आपल्या दुःखाला कधीही प्रकट होऊ दिलं नाही.उलट,त्यांनी आमच्यासाठी प्रत्येक वेळी आनंदाचा आणि प्रेरणेचा स्रोत बनून राहण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या वडिलांच्या आदर्शांवर चालू शकलो आणि जीवनात खंबीर उभं राहण्याची शिकवण मिळाली. आज मी ज्या काही ठिकाणी उभा आहे,त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईसाहेबांना जातं.वडिलांचं असलेलं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी जे धैर्य,कणखरपणा आणि प्रेम दाखवलं,त्यासाठी त्यांचं ऋण व्यक्त करणं ही केवळ औपचारिकता नाही,तर ती माझ्या जीवनाची खरी प्रेरणा आहे.त्यांच्या संस्कारांमुळेच मी आज सक्षम आहे. दि.२५ जानेवारी २०२४ रोजी आईसाहेबांच्या निधनामुळे मी पोरका झालो.कारण आण्णांची उणीव आईसाहेबांनीच भरून काढली होती.प्रत्येकाला मरण हे अटळ आहे हे सत्य स्वीकारून मी खंबीर होण्याचा प्रयत्न करीत आहे.मराठी तिथीप्रमाणे दि.१३ जानेवारी २०२५ रोजी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम जड अंतकरणाने पार पाडला असला तरी इंग्रजी तारखेप्रमाणे २५ जानेवारी २०२५ रोजी सा.साक्षी पावनज्योतच्या विशेषांकातून आईसाहेबांच्या प्रथम स्मृतीस विनम्र अभिवादन.
” Aayisaheb yanchya smruti VINAMRA Abhiwadan”