August 8, 2025

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना वैयक्तीक शेततळयासाठी अर्ज मागविले

  • धाराशिव(जिमाका) शेततळयाच्या माध्यमातून शेतीस संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना अर्थात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजेतून शेतकऱ्यांना वैयक्तीक शेततळयाचा लाभ देण्यात येतो.पूर्वी या योजनेचा लाभार्थ्यांचा लक्षांक निश्चित करण्यात आला होता.परंतु आता मागेल त्या शेतकरी अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
    या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ३४X३४ X ३ मीटर व कमीत कमी १५×१५×३ मीटर असे विविध ८ प्रकारच्या आकारमानाचे इनलेट आऊटलेटसह किंवा इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्यासाठी खोदकामाच्या परिमाणाच्या प्रमाणात कमाल मर्यादा रक्कम ७५ हजार रुपये मर्यादित अनुदान देय राहील.तसेच यापुर्वी केवळ खोदकामास अनुदान होते.परंतु सध्या खोदकामासह अस्तरीकरणाला शेततळे आकारमानानुसार रु ७५ हजार रुपये देण्यात येणार असुन ३४X३४X३ मीटर शेततळयाला रु.१ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
    छत्रपती शिवाजी महाराज कृषी (मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन) योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यासाठी मागील त्या अर्जदाराला लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.40 जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्रधारकास कमाल मर्यादा नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी जमीन शेततळे खोदण्यास जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे.
    अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login या संकेतस्थळावर सीएस्सी केंद्रामार्फत अथवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन नोंद करून या योजनेचा लाभ घ्यावा.या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!