August 8, 2025

कष्टकऱ्यांचे मानवाधिकार अबाधित ठेवण्यासाठीच कामगार कायद्यांची निर्मिती – अँड.सुभाष सावंगीकर

संभाजी नगर – कष्टकऱ्यांच्या सर्व मानवी गरजा भागविणे हे मानवाधिकाराचा भाग असून , त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठीच कामगार कायद्यांची निर्मिती झाली,हे कोणीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस अँड. सुभाष सावंगीकर यांनी केले.
दि.१० डिसेंबर २०२४ रोजी जागतिक मानवाधिकार दिवसानिमीत्त,संविधान भवन या संघटनेच्या कार्यालयावर आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साथी देवीदास कीर्तीशाही होते तर यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मालकवर्ग,कारखानदार,माथाडी मंडळ व शासन हे कायद्याचे चौकटीतील प्रश्न न सोडविता, वर्षानुवर्ष ते प्रलंबित ठेवले जातात,असे करणे म्हणजे माथाडी कामगारांचे मानवी व कायदेशीर अधिकार नाकरण्याचाच प्रकार होय, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक व आर्थिक दृष्ट्या शोषित,उपेक्षित कष्टकऱ्यांना लोकशाही पद्धतीने सत्तेवर गेलेल्यांनी त्यांच्या सर्व मानवाधिकारांचे जतन-संरक्षण करायला हवे,ते त्यांचे कर्तव्य आहे.मात्र या असंघटित व असुरक्षित कष्टकऱ्यात जाती – धर्माचे नावाने बखेडे निर्माण करून फूट पाडली जाते,त्यांची एकजूट होणार नाही याची दक्षता घेतली जाते.म्हणून तमाम कष्टकऱ्यांनी मालकवर्गाच्या या षडयंत्रास बळी न पडता,भक्कम एकजूट उभी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी यावेळी केले.शेवटी अध्यक्षीय समारोप साथी देविदास किर्तीशाही यांनी केला.यावेळी साथी प्रविण सरकटे, साथी सर्जेराव जाधव, साथी राजू सुसुंद्रे, साथी गणेश तरटे, साथी प्रकाश जाधव, साथी गौतम बनकर, इ. ची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!