कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – समाजसेवेची नवी दिशा दाखवणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि पर्याय संस्थेचे संस्थापक सचिव विश्वनाथ अण्णा तोडकर यांचा ६१ वा वाढदिवस पर्याय संस्था हसेगाव (के) ता.कळंब येथे दि.१ डिसेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात आणि सामुदायिक भावनेने साजरा करण्यात आला, ३०० एकल महिलांना साडी वाटप करून याठिकाणी भाऊबीज साजरी करून त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच जमा झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. समारंभाची सुरुवात आरोग्य शिबिराने सकाळी पर्याय प्रशिक्षण केंद्रात एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा आढावा घेण्यासाठी विविध तपासण्या व सल्ला सत्रे घेतली गेली.यामध्ये हृदयविकार,मधुमेह,रक्तदाब, आणि अन्य आजारांसाठी तपासणी करण्यात आली. डॉ.हर्षदा पटकुरे (तोडकर) यांनी या शिबिराचे नेतृत्व केले. महिलांसाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी अण्णांचे मनापासून आभार मानले. आरोग्य शिबिरानंतर एकल महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प्रत्येक महिला सन्मानास पात्र आहे,या विचारातून अण्णांनी या उपक्रमाची सुरुवात केली. साडी वाटप सोहळ्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला.यावेळी महिलांनी आपला सन्मान आणि आदर प्रकट करत अण्णांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल कौतुक केले. धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी अण्णांच्या कार्याची स्तुती करताना सांगितले,की विश्वनाथ अण्णांचे योगदान केवळ एकल महिलांसाठीच मर्यादित नाही,तर त्यांनी समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकासाठी आधारस्तंभाची भूमिका निभावली आहे.त्यांचे नेतृत्व समाजसेवेत क्रांतिकारक ठरले आहे. सायंकाळी मुख्य समारंभ संपन्न झाला.महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,मान्यवर आणि अण्णांचे कुटुंबीय या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात अण्णांच्या कार्याचे कौतुक करणाऱ्या भाषणांनी झाली. यावेळी विविध मान्यवरांनी तोडकर अण्णांच्या वैयक्तिक आणि सामाजिक कार्यावर भाष्य केले.त्यांनी अण्णांच्या सहनशीलता,नेतृत्वगुण,आणि लोकांसाठी काहीतरी चांगले करण्याच्या जिद्दीचे कौतुक केले. “विश्वनाथअण्णांचे जीवन म्हणजे समर्पण आणि प्रेरणा यांचे उत्तम उदाहरण आहे,”असे मत विविध वक्त्यांनी मांडले.
पर्याय आणि अनिक टीमचे उत्कृष्ट आयोजन – कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन पर्याय आणि अनिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कौशल्याने हाताळले. महिला आरोग्य शिबिरापासून रक्तदान शिबिरापर्यंत आणि मुख्य सोहळ्याच्या व्यवस्थापनापर्यंत सर्व जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पार पाडण्यात आल्या. या आयोजनामध्ये भूमिपत्रजी वाघ,सौ.तेजश्री भालेराव (तोडकर),ऋषिकेश तोडकर यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाच्या समारोपात विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले की,माझ्या या सामाजिक प्रवासात आपण सर्वांनी जो पाठिंबा दिला आहे, तोच माझ्या कार्याचा आधार आहे. माझे यश केवळ माझे नाही, तर आपले सर्वांचे आहे. माझे आयुष्य समाजासाठी समर्पित राहील, आणि या सोहळ्याने मला अधिक प्रेरित केले आहे. विश्वनाथ अण्णा यांचा हा वाढदिवस फक्त एक एकसष्टीचा सोहळा नव्हता,तर समाजसेवेच्या नव्या संकल्पांसाठी प्रोत्साहन देणारा एक महत्त्वाचा टप्पा होता.एकल महिलांच्या उत्थानासाठी, उपेक्षित घटकांसाठी आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी अण्णांचे कार्य भविष्यातही प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे. विश्वनाथअण्णा तोडकर यांचा ६१ वा वाढदिवस समाजसेवेच्या नव्या उंचीचे प्रतीक ठरला असून सामुदायिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितानी व्यक्त केली. याप्रसंगी विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या कार्याचे अवलोकन करणारा सा.साक्षी पावनज्योतचा एकसष्टी सोहळा विशेषांकाचे प्रकाशन आ.कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन