कळंब- शेगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग वरील अर्धवट काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब यांना दिला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विदर्भातील असंख्य वारकरी, दिंडी व पालखी सोहळे कळंबमार्गे पंढरपूरला जातात. या लाखो वारकर्यांची पायी वारी सुकर व्हावी तसेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र हे भौतिकदृष्ट्या भाग एकमेकांना जोडले जावे अशा उद्देशाने २०१६ साली केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने ‘शेगाव पंढरपूर’ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी यास मान्यता दिली. यानंतर याचे टप्पेनिहाय निविदा प्रक्रिया झाली. यात केज-कळंब-कुसळंब हा बीड जिल्हातील केज व सोलापूर कुसळंब (ता. बार्शी जि. सोलापूर ) हा ‘पॅकेज १७’ नावाचा ६० किलोमीटर लांबीचा टप्पा आहे. सदर कामाची जबाबदारी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) खांद्यावर सोपवली होती. याचा ठेका हैदराबाद येथील एका ठेकेदाराला मिळाल्यानंतर काम तांत्रिकदृष्ट्या योग्य स्थितीत व गतीत करून घेण्याची जबाबदारी रस्ते विकास विभागाच्या अभियंत्याची होती. मात्र २०१७ साली सुरू झालेले हे दोन वर्ष मुदतीचे काम ७ वर्ष झाले तरी पुर्ण झालेले नाही. कळंब शहर, कळंब शहरालगतचा भाग, मांजरा नदी पूल, बीड जिल्हा सरहद्दीचा भाग, येरमाळा गाव, येरमाळा घाट, सोलापूर जिल्हा सरहद्दीच्या लगत असलेले पूल व रस्ता, कन्हेरवाडी पाटी अशा अनेक ठिकाणी अनेक वर्षापासून काम अर्धवट आहे. शिवाय, झालेल्या कामाचा अनेक ठिकाणी दर्जा निकृष्ट आहे. येरमाळ्यालगत रस्त्याच्या मधोमध फट पडली आहे. यात दुचाकीस्वाराचा ताबा सुटून अपघात होत आहे आहेत. कळंब शहरातील मोक्याच्या अशा चौकातील कामे अर्धवट आहेत. मस्सा, तेरणा नदी आदी ठिकाणी पुलावरील जम्पिंग अपघाताला निमंत्रण देत आहे. यामुळे खालील मागण्यांसंदर्भात त्वरीत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. मांजरा नदीवरील पुलाचे काम त्वरित पुर्ण करून तो वाहतूकीस खूला करावा,बीड जिल्हा हद्दीलगतच्या खड्डेमय झालेल्या भागावर तात्पुरते पॅचवर्क करावे, तद्नंतर लागलीच पुढील काम हाती घ्यावे, कळंब शहरातील मांजरा नदी ते मानधने पंपापर्यंतचे अर्धवट काम तातडीने पुर्ण करावे, मस्सा, तेरणा नदी याठिकाणच्या पुलावरील जम्पिंग अपघातप्रवण झाल्या आहेत. त्यावर मार्ग काढावा,येरमाळा गावातील काम तातडीने पुर्ण करावे, घाट सेक्शन तसेच पुढील सोलापूर हद्दीपर्यंतचे रस्ता व पूल काम तातडीने पुर्ण करावे. उपरोक्त मागण्या या स्थानीक नागरीक, वाहनधारक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, वारकरी व प्रवासी यांच्या सुखकर प्रवासासाठी तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. आजवर अनेक अपघात झाले, काहींचे जीव गेले, अनेकांना जायबंदी व्हावे लागले, कोणाची लूट झाली. हे पुढील काळात होवू नये यासाठी रस्ते विकासाच्या अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी तसेच उर्वरीत प्रलंबित कामे संबधीत ठेकेदाराने तात्काळ पुर्ण करावीत अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याशिवाय अन्य पर्याय राहणार नाही.या निवेदनावर माणिक बोंदर, ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला, चर्मकार युवक अध्यक्ष विकास कदम, रोहित कोमटवार, हर्षद अंबुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले