लातूर – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कौशल्याधिष्ठित विद्यार्थी घडवून आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणारे आहे असे प्रतिपादन श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे नूतन अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांनी केले. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सभागृहामध्ये नवनिर्वाचित संस्था कार्यकारणी मंडळ पदाधिकारी सन्मान सोहळा आणि संस्था व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सुसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), सचिव माधवराव पाटील (टाकळीकर), सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बस्वराज येरटे, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक अॅड. काशिनाथ साखरे, संचालक प्रा. गुरुलिंग धाराशिवे, कुमार स्वामी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. काशिनाथ राजे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई आणि उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रजनन करण्यात आले. संगीत विभागाच्यावतीने प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार आणि प्रा. सरस्वती बोरगावकर यांनी शारदास्तवन आणि स्वागत गीत सादर केले. नवनिर्वाचित सर्व संस्था संचालकांचे महाविद्यालयाच्यावतीने शाल, महात्मा बसवेश्वर प्रतिमा, स्मृतिचिन्ह आणि पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आदिनाथ सांगवे म्हणाले की, जगभरातल्या कोणत्याही समाजामध्ये शिक्षक, प्राध्यापक आणि महिला भगिनी यांचा सन्मान होतो. भारतीय संस्कृती ही मातृदेवो भव, पितृ देवो भव आणि गुरुदेवो भाव अशी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुजनांचा आदर केला जातो त्यामुळेच देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे. शिक्षण हे पवित्र असे कार्य आहे. नवीन शैक्षणिक धोरणात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना केंद्रभूत म्हणून देशाच्या विकासाचा आराखडा आखलेला आहे. विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक यांच्यात सुसंवाद वाढून शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येते. असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना माधवराव पाटील टाकळीकर यांनी महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग केला गेला पाहिजे. तत्त्व आणि व्यवहार यांच्यामध्ये साम्य असले पाहिजे. तरच महात्मा बसवेश्वरांच्या विचारातील स्वप्नातील समाज निर्माण होऊ शकतो असे ते म्हणाले. या कार्यक्रमात सुनीलप्पा मिटकरी, विजयकुमार रेवडकर, राजेश्वरजी बुके आणि डॉ. काशीनाथ राजे यांनी आपल्या मनोगतातून कार्य संस्कृती रुजवण्याची गरज वर्तविली. यावेळी उपस्थित सर्व नवनिर्वाचित संस्था पदाधिकाऱ्यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ग्रंथसंपदेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट सुद्धा दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केले. महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपआपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. किसनाथ कुडके यांनी केले तर आभार डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग