कळंब (राजेंद्र बारगुले) – इस्लाम धर्माचे अभ्यासक व धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी मुंबई शहरातील घाटकोपर येथून अटक केली आहे. या बेकायदेशीर अटके विरोधात कळंब येथील मुस्लिम समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुफ्ती सलमान अजहरी यांची अटक गुजरात पोलिसांनी केली आहे. तो खटला द्वेषपूर्ण भाषणाशी संबंधित असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी चे कलम १५३ (बी) आणि ५०५ या गुन्ह्यात वापरण्यात आले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अटक करणे बेकायदेशीर आहे. त्यांना कायदेशीर नोटीस देणे बंधनकारक होते. मात्र, गुजरात सरकार भारतात राहणाऱ्या अल्पसंख्याक समुदायावर दबाव आणण्यासाठी अशी कारवाई करत आहे. मौलाना सलमान अजहरी यांच्या अटकेमुळे लोकशाहीला मानणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मौलाना सलमान अजहरी यांचे कौतुकास्पद असलेले सामाजिक कार्य दडपून टाकण्यासाठी ही कारवाई केली गेली असून त्यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी. अन्यथा सदरील बेकायदेशीर अटकेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम समाजाकडून देण्यात आला. या आंदोलनात शहरातील सर्व मौलाना व सकल मुस्लिम समाज उपस्थित होता.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले