April 10, 2026

माथाडी कामगारांना पोलिस संरक्षण द्या;अन्यथा मुंबईत मोर्चाचा इशारा

  • छत्रपती संभाजीनगर – कायदेशीर व नोंदणीकृत माथाडी कामगारांना तात्काळ पोलिस संरक्षण द्यावे,अन्यथा मुंबई पोलिस महासंचालनालय येथे मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा मराठवाडा लेबर युनियन व महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी दिला.
    या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने आज पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय येथे माथाडी कामगारांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली.शांततामय व अहिंसक पद्धतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात विविध भागातील कामगार सहभागी झाले होते.
    माथाडी कायद्यानुसार बाजार समित्या,कारखाने,भाजी-फळ मार्केट,शासकीय व खाजगी गोदामे तसेच रेल्वे गुड्स शेड्स येथे केवळ नोंदणीकृत माथाडी कामगारांकडूनच काम करून घेणे बंधनकारक आहे.मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर व बिगर नोंदणीकृत कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याने नोंदणीकृत कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
    यासंदर्भात तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार जिल्हा माथाडी मंडळाने कोंकण ऍग्रो कंपनी येथे तीन वर्षांपासून कामावरून कमी करण्यात आलेल्या नोंदणीकृत कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले.मात्र कंपनी व्यवस्थापनाने या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
    राज्याच्या पोलिस महासंचालकांनी २०१० मध्येच आवश्यकतेनुसार माथाडी कामगारांना पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले असतानाही प्रत्यक्षात ते मिळत नसल्याने कामगारांना संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे लोमटे यांनी सांगितले.
    निदर्शनानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी आवश्यक त्या ठिकाणी पोलिस संरक्षण देण्यात येईल तसेच या प्रश्नावर जिल्हास्तरीय बैठक आयोजित केली जाईल,असे आश्वासन देण्यात आले.
    या आंदोलनाचे नेतृत्व सुभाष लोमटे,मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस ॲड.सुभाष सावंगीकर व बाजार समिती संचालक देविदास किर्तीशाही यांनी केले.आंदोलनात छगन गवळी,प्रवीण सरकटे,जगन भोजने,सलीम भाई,भारत गायकवाड,सर्जेराव जाधव, कल्याण तुपे,किशोर मगरे आदी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
error: Content is protected !!