धाराशिव (जिमाका) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यास सुरुवात झाली असून या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उत्साहात पार पडला.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अमोल ताकभाते उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचा उल्लेख करत मूलभूत हक्कांची जाणीव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच त्यांच्या विविध चळवळी आणि सत्याग्रहांची माहिती देत सामाजिक समता सप्ताहाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या सप्ताहादरम्यान स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन,ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला,स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर,जयंती उत्सव, विविध स्पर्धा तसेच सामाजिक समता रथाद्वारे जनजागृती असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमात आकांक्षा कोकाटे, दीक्षा भालशंकर,मोनिका गवळी व वैष्णवी माने या विद्यार्थिनींना जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त शंकर काशिनाथ खुने,विजयकुमार गायकवाड,अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त सुधाकर सगट, कैलास पवार तसेच संत रोहीदास चर्मकार समाजभूषण पुरस्कारप्राप्त भैरवनाथ कानडे यांचा संविधानाची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्याख्याते व साहित्यिक भैरवनाथ कानडे आणि महेंद्र चंदनशिवे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक भारत” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी,विविध संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद सीईओ प्रियंवदा महाडदळकर यांचे पुस्तक देऊन स्वागत
समता सप्ताहात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश; “गरजूंसाठी मोफत न्याय हेच ध्येय” – भाग्यश्री पाटील
समता सप्ताहात विजय गायकवाड यांचा गौरव;संविधान उद्देशिकेने सन्मान