April 10, 2026

समता सप्ताहात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश; “गरजूंसाठी मोफत न्याय हेच ध्येय” – भाग्यश्री पाटील

  • धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह (दि. ८ ते १४ एप्रिल २०२६) विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.
    या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी दि. ९ एप्रिल रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख उपस्थित होते.
    कार्यक्रमादरम्यान पायल नन्नावरे, आदित्य कदम,स्वप्नील माने, वैष्णवी बीडबाग,निशा खुडे आणि सुमीत सावंत या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना तसेच भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजनांतर्गत प्रत्येकी ४५ हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. हे धनादेश भाग्यश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
    यावेळी बोलताना भाग्यश्री पाटील यांनी, “गरजू व वंचित घटकांना मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख ध्येय आहे,” असे सांगत लोकअदालत, मध्यस्थी केंद्र, बालस्नेही योजना तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ व विधी सेवा हेल्पलाईन १५१०० याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विधी सेवा योजनांबाबत जनजागृती करणाऱ्या भित्तीपत्रिकेचे अनावरणही करण्यात आले.
    समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच आदिवासी विभागाच्या शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू गुणवत्ता पुरस्कार, महाडीबीटी प्रणाली, स्वाधार योजना, स्वयंम योजना आणि सैनिकी शाळा शिष्यवृत्ती योजना यांसारख्या विविध उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
    या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप, अतुल मुक्ते तसेच लिपिक संकेत जगताप व संकेत भोसले यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!