खामसवाडी – जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खामसवाडी गावातील एका सर्वसामान्य पोलीस कुटुंबातील मुलीने वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करत गावाचा मान उंचावला आहे.खामसवाडी येथील रहिवासी व धाराशिव जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले जगन्नाथ नामदेव गुंड यांची द्वितीय कन्या डॉ.प्रमिला जगन्नाथ गुंड हिने मुंबई येथील नामांकित जे.जे.मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिपही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. तिच्या पदवी प्रदान समारंभाचे आयोजन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.या यशामुळे गुंड कुटुंबासह संपूर्ण खामसवाडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. प्रमिला गुंड यांच्या वडिलांनी सांगितले की,पोलीस नोकरीमुळे सतत बदल्या होत असल्याने मुलांना वारंवार शाळा बदलाव्या लागल्या.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा ढोकी येथे, तर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय तुळजापूर येथे पूर्ण झाले. त्यानंतर प्रमिला हिने मुंबईत एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळवून कठोर परिश्रमांच्या जोरावर हे यश संपादन केले. ते पुढे म्हणाले, “पोलीस कुटुंबात वैद्यकीय क्षेत्राचा कोणताही वारसा नसताना आमच्या दोन्ही मुलींनी डॉक्टर होण्याचा मान मिळवला,ही आमच्यासाठी आणि गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.” डॉ. प्रमिला गुंड यांची मोठी बहिण डॉ. प्रियांका गुंड हिने देखील एम.बी.बी.एस. व एम.एस. पदवी प्राप्त केली असून सध्या सेवाग्राम मेडिकल कॉलेज,वर्धा येथे कार्यरत आहे. दोन्ही बहिणींनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविल्याने गुंड कुटुंबाचा सन्मान वाढला आहे. डॉ. प्रमिला गुंड यांच्या या यशाबद्दल खामसवाडी ग्रामस्थांसह विविध स्तरांतून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
More Stories
शहरासह ग्रामीण भागात रामनवमी उत्साहात साजरी
मोबाईलच्या अतिरेकाने संवाद हरवला;तरुणाई व्यसनाच्या विळख्यात – विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू