कळंब – आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक समाजासाठी धोकादायक ठरत असून,मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कुटुंबातील संवाद हळूहळू संपुष्टात येत आहे.याचा परिणाम थेट सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर होत असल्याची गंभीर बाब अधोरेखित करत विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी समाजाने वेळेत जागे होण्याचे आवाहन केले. ते दि.२७ व २८ मार्च २०२६ रोजी कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथे ‘पर्याय फाउंडेशन’च्या प्रशिक्षण कॅम्पसमध्ये आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करत होते.
तोडकर अण्णा म्हणाले की,तरुण पिढी मोबाईलच्या अतिरेकामुळे ऑनलाईन गेम्स आणि सोशल मीडियाच्या आहारी जात आहे.या व्यसनामुळे अनेक तरुण चरस, गांजा,ड्रग्ससारख्या घातक पदार्थांकडे वळत आहेत. परिणामी अनेक कुटुंबे कर्जबाजारी होत असून,त्यांचे आर्थिक व मानसिक संतुलन ढासळत आहे. महिलांनी पुढाकार घेण्याची गरज कुटुंब वाचवायचे असेल तर महिलांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.घरात शिस्त, बचत आणि योग्य आर्थिक नियोजनाची सवय लावल्यास कुटुंब मजबूत होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
बचत गटांनी बदलली गावांची आर्थिक परिस्थिती महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठा सकारात्मक बदल घडत आहे.खाजगी सावकारकीला आळा बसत असून,महिलांनी घेतलेल्या कर्जाचा उपयोग व्यवसाय उभारण्यासाठी करून कुटुंबाच्या प्रगतीला चालना दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. हा मेळावा ‘द पर्याय फाउंडेशन’, ‘सावित्रीबाई फुले मॅच्युअल बेनिफिट ट्रस्ट’,‘अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि.’आणि ‘लोक पर्याय डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. दि.२७ मार्च रोजी कळंब तालुक्यातील सुमारे ४५० महिला, तर २८ मार्च रोजी वाशी तालुक्यातील सुमारे ५५० महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मान्यवरांचे मार्गदर्शन या प्रसंगी मोहीम प्रमुख विलास गोडगे, संचालक ऋषिकेश तोडकर, अनिता ताई तोडकर,तेजश्री भालेराव,सुनंदा खराटे यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी शेंडगे व भिकाजी जाधव यांनी केले.यावेळी व्यवस्थापक विकास भिसे,महादेव जाधवर,क्षेत्र अधिकारी वैभव चोंदे,प्रमिला राख तसेच इतर क्लस्टर असिस्टंट कार्यकर्त्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात महिला बचत गटातील यशस्वी उद्योजक महिलांनी आपल्या प्रेरणादायी यशोगाथा मांडून इतर महिलांना प्रोत्साहन दिले.
यशस्वी आयोजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रुबा गायकवाड यांनी केले,तर आभार प्रदर्शन कल्पना जतकर व ज्योती शिंदे यांनी केले.मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लेखापाल विकास कुदळे,परमेश्वर गवारे, आनंद जाधव,रियाज शेख, प्रकाश तोडकर,प्रवीण लाकाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
पोलीस कुटुंबातील दोन्ही मुली डॉक्टर;खामसवाडीचा उंचावला मान
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!