March 28, 2026

बदलापूरमध्ये ‘प्रबोधन कट्टा’चा शुभारंभ;शिक्षण-करिअर मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • बदलापूर – बदलापूर पश्चिम येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान स्मारक परिसरात ‘प्रबोधन कट्टा’ या सामाजिक उपक्रमाचे लोकार्पण नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास विद्यार्थी,नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी विशरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून लोकार्पण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी बदलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, ‘बालकन्या योजना’आणि महिलांसाठी संस्कार केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
    ‘प्रबोधन कट्टा’ ही संकल्पना समाजात जागरूकता निर्माण करणारी असून,या माध्यमातून शिक्षण,सामाजिक भान आणि व्यक्तिमत्व विकास यांना चालना मिळेल,असेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाला प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजाराम खरात यांनी ‘प्रबोधन कट्टा’च्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले.समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
    या निमित्ताने आयोजित शिक्षण व परदेशी नोकरी संधी मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रा.योगेश साळवे यांनी उच्च शिक्षणातील विविध पर्याय,स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.प्रा.अनिल भालेराव यांनी शिक्षणासोबत सामाजिक एकतेचे महत्त्व पटवून दिले,तर भूषण रामटेके यांनी परदेशात शिक्षण,शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधींबाबत उपयुक्त माहिती दिली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल शिर्के यांनी केले.या कार्यक्रमास विविध मान्यवर,विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    ‘प्रबोधन कट्टा’च्या माध्यमातून बदलापूरमध्ये शैक्षणिक व सामाजिक चळवळीला नवे व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!