तुळजापूर – शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर न्याय मिळवण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे.ही यात्रा सोमवार,दि. ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक,सुरतगांव येथून सुरू होऊन तुळजापूर येथे दाखल होणार आहे. या यात्रेचा समारोप तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सभेत होणार असून, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तीव्र आवाज उठवण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेद्वारे शेतकऱ्यांनी अनेक गंभीर प्रश्न मांडले आहेत. सुरत–चेन्नई महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे योग्य मूल्यांकन न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्ग कायदा नुसार बाजारभावाच्या तुलनेत कमी मोबदला देण्यात आल्यामुळे शेतकरी २०१९ पासून कायदेशीर लढा देत आहेत. तसेच सोलापूर–धाराशिव–बीड रेल्वे प्रकल्पातील जमिनींनाही अत्यल्प मोबदला देण्यात आल्याची तक्रार आहे.२०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे चारपट दराने मोबदला देण्याची मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली आहे. २०२० ते २०२५ या कालावधीतील पीकविमा अद्याप मिळालेला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.तसेच जाहीर केलेली कर्जमाफी प्रत्यक्षात न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी १ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. महावितरणकडून मिळणाऱ्या विजेचा कालावधी ८ तासांवरून ५ तासांवर आणण्यात आल्याचा आरोप असून,तीही अनियमित मिळत असल्याने शेतीवर परिणाम होत आहे.सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी,स्मार्ट मीटरची सक्ती करू नये,अशीही मागणी करण्यात आली आहे. मागेल त्याला सौरपंप योजना राबवताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतले,मात्र पंप दिले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. कांद्याला ३००० रुपये हमीभाव देण्याची मागणी असून, २०२५-२६ साठी प्रति किलो १५०० रुपये अनुदान देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सोयाबीन व हरभरा खरेदी केंद्रांना निधी उपलब्ध करून देणे,‘पोखरा’ योजनेची अंमलबजावणी गतीने करणे, तसेच घरकुल योजनेचे प्रलंबित निधी तात्काळ वितरित करावेत, अशा मागण्या पुढे आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात वन्य डुकरांचा वाढता त्रास रोखण्यासाठी उपाययोजना करावी,देवस्थान व इनाम जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरित कराव्यात,तसेच जिल्ह्यातील सुमारे ३.५ लाख शेतमजुरांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा विविध मागण्या या यात्रेतून मांडण्यात येणार आहेत. दरम्यान,या ‘संघर्ष न्याय यात्रेत’ मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून,प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा निर्णायक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
More Stories
तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ
ओबीसी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार प्रवीण स्वामी सरांची सकारात्मक भूमिका – समाधानाचा नवा किरण
न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळावा – न्या.प्रसन्न वराळे