कळंब – तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील श्री संतयोगी साधुबुवा महाराज यांच्या पावन भूमीत महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण व संजीवन समाधी सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडत आहे. दि.९ फेब्रुवारी २०२६ पासून प्रारंभ झाला असून ह.भ.प.नवनाथ झाडके महाराज(कळंब),ह.भ.प.बापुदेव जोशी महाराज (मोहा),ह.भ.प.अच्युत महाराज आंबिरकर (डिकसळ),ह.भ.प.दत्ता महाराज अंबिरकर (डिकसळ),ह.भ.प. माऊली महाराज जगताप (पालसिंगन),ह.भ.प आप्पा महाराज जावळे हाळदगाव,ह.भ.प.बाळासाहेब बोधले महाराज डिकसळ,ह.भ.प.श्रीनिवास जगताप महाराज पालसिंगन हे अमृततुल्य कीर्तन करणार आहेत.झालेल्या या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी,दि.११ फेब्रुवारी २०२६ वार बुधवार रोजी सायंकाळी स्मृतीशेष बगडाबाई दशरथ घोडके यांच्या स्मरणार्थ सुभाष घोडके यांच्या वतीने भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भक्त उपस्थित होते. यावेळी रात्री ठीक ९ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज आंबीरकर (डिकसळकर) यांचे अमृततुल्य कीर्तन संपन्न झाले.आपल्या ओजस्वी वाणीतून त्यांनी संतांच्या जीवनातील त्याग, साधना आणि समाजसेवेचा आदर्श मांडताना “भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात”असे प्रतिपादन केले.संत हे ईश्वराचे साक्षात स्वरूप असून त्यांच्या सहवासातून समाजात सद्भावना, नैतिकता आणि अध्यात्मिक जागृती निर्माण होते,असे त्यांनी स्पष्ट केले.कीर्तनादरम्यान भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमास माजी सरपंच सुखदेव टेकाळे,विविध विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सतीश टेकाळे,प्रकाश भंडगे,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,बाळासाहेब पवार,मधुकर बारगुले,अंकुश पांचाळ,अशोक साखरे,तुकाराम दत्त,सहशिक्षक सोमनाथ गुजर,बापूराव गुजर,लक्ष्मण घोडके,ग्यानदेव टेकाळे,भागवत सोमासे,रामदास टेकाळे,संजय स्वामी,राजेंद्र बारगुले,अविनाश घोडके,सागर घोडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज पहाटे काकडा आरती,दिवसभर हरिनाम संकीर्तन,ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरात श्रद्धाळूंची सतत वर्दळ सुरू आहे. या कीर्तनसेवा व महाप्रसाद सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल साधुबुवा मंदिर विश्वस्त मंडळ समितीचे अध्यक्ष नारायण (आप्पा) दशवंत यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या निमित्ताने पुढील दिवसांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव डोळा येथील मंदिरास भेट
पिंपळगाव डोळा येथे अंबाबाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात
“जिल्हा परिषद निवडणुकीत मंगरूळ गटाचा अजेंडा:विकास की फक्त राजकारण?”